अमर मोहिते ल्ल मुंबईमीरा-भार्इंदर येथील भाजपाचे आमदार आणि नगरसेवक नरेंद्र मेहता यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्याअंतर्गत खटला चालवण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी हिरवा कंदील दाखवला़ त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते़ मेहता हे मीरा-भार्इंदर महापालिकेचे महापौरही होते़मेहता यांनी २००२मध्ये एका कंत्राटदाराकडे लाच मागितली होती़ ही लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ त्यांच्याविरोधात ठाणे येथील विशेष न्यायालयात खटला चालला़ आपण केवळ नगरसेवक आहोत, सरकारी नोकर नाही़ त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आपल्याविराधोत खटला चालू शकत नाही़ त्यामुळे या आरोपातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज मेहता यांनी विशेष न्यायालयात केला़ तो मान्य करीत न्यायालयाने मेहता यांना दोषमुक्त केले होते.याविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली़ न्या़ एम़एल़ ताहिलयानी यांच्यासमोर याची सुनावणी झाली़ त्यात सरकारी वकील विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी नगरसेवक हा सरकारी नोकर असल्याचे न्यायालयाला पटवून दिले़ नगरसेवक हा नागरिकांना सुविधा देत असतो़ तसेच सर्वोच्च न्यायालयाने नगरसेवक हा सरकारी नोकर असल्याचे स्पष्ट केले आहे़ त्यामुळे मेहता यांना दोषमुक्त करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे, असा युक्तिवाद अॅड़ कोंडे-देशमुख यांनी केला़ तो ग्राह्य धरत न्यायालयाने नगरसेवक हा सरकारी नोकरच असल्याचा निर्वाळा दिला़ तसेच मेहता यांना लाचेच्या खटल्याला सामोरे जावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़
आमदार नरेंद्र मेहता यांना लाच भोवणार
By admin | Updated: March 4, 2015 02:18 IST