नवी मुंबई : राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबईमध्ये अद्याप पुरेशी स्वच्छतागृह नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महिलांसाठी एकही मोफत स्वच्छतागृह नाही. ही गैरसोय दूर करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आमदार निधीतून शहरात ३० स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. नवी मुंबई हे सुनियोजीत शहर म्हणून ओळखले जाते. महापालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट सिटी पुरस्कारापासून स्वच्छतेसाठीचे पुरस्कार घेणाऱ्या शहरातील हजारो नागरिकांना आजही उघड्यावर शौचास जावे लागत आहे. पामबीच रोड, सायन पनवेल महामार्ग, ठाणे बेलापूर रोडवर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. महापालिकेच्या प्रभाग १ मध्ये पाच हजार पेक्षा जास्त नागरिकांसाठी फक्त एकच स्वच्छतागृह आहे. नवी मुंबईचे मरीन ड्राईव्ह समजल्या जाणाऱ्या पामबीच तसेच उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सीवूड्सारख्या भागात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. शहरातील ही मोठी गैरसोय दूर करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाची मांडलेली धोरणे लक्षात घेवून आमदार निधीचा सर्वाधीक आवश्यकता असलेल्या कामांसाठी उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
‘स्वच्छ भारत’ला देणार आमदार निधी
By admin | Updated: July 13, 2015 02:41 IST