कळंबोली : जुनाट जलवाहिनी त्याचबरोबर अनधिकृत झोपडपट्टीधारक पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीची तोडफोड करीत आहेत. त्यामुळे या वाहिनीला फुटीचे ग्रहण लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या प्रकारामुळे एमजेपीचे अधिकारी आणि कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. रोज एका ठिकाणी जलवाहिनी फुटत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडला आहे. जीवन प्राधिकरणाच्या भोकर पाडा येथील जवाहरलाल नेहरू जलशुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान २८ वर्षांपूर्वी ११५ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती. या वाहिनीद्वारे पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व आजूबाजूच्या १९ गावांतील सुमारे १५ लाख रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पळस्पे फाटा येथून टी पॉइंट काढून जेएनपीटीलाही पाणी दिले जाते, आजूबाजूची गावेही यावर अवलंबून आहेत. परंतु ही वाहिनी अतिशय जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली आहे. परिणामी पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहेत, शिवाय सुमारे तीस किमी अंतर असलेल्या या जलवाहिनीलगत अनेक अनधिकृत झोपड्या वसल्या आहेत. झोपडपट्टीवासीय पाण्यासाठी जलवाहिनी फोडत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी एमजेपीकडून सातत्याने शटडाऊन घेतला जात आहे. त्यामुळे पनवेलकर आणि सिडको वसाहतवाल्यांना तीन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जुनाट झालेल्या जलवाहिन्या न बदलता केवळ पॅच मारण्याचे काम होत आहे. सिडको एमजेपीकडून सर्वाधिक पाणी घेत असल्याने सिडकोने एमजेपीला वाहिन्या बदलण्याकरिता निधी द्यावा, असा प्रस्ताव होता. मात्र त्याच्यावर कोणताही निर्णय झाला नसून परिस्थिती जैसे थे आहे. (प्रतिनिधी)
एमजेपीचे ‘पाणी’पत सुरूच
By admin | Updated: May 9, 2015 22:53 IST