ठाणे : लोकमान्यनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. ३५ मध्ये आठवीत शिकणारा प्रणय पाशीरकर (१५) हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाला होता. तो अचानक पुन्हा घराजवळच्याच परिसरात मिळाल्याने त्याच्या आई वडीलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.लोकमान्यनगर पाडा क्र. ४ येथील स्वामी समर्थ चाळीत राहणारा प्रणय हा १५ डिसेंबर रोजी शाळेतून एक तास लवकर आला होता. नेहमी पावणे एकला येणारा प्रणय त्यादिवशी पावणे १२ वा. घरी आला. त्यामुळे त्याची आजी उषा तावडे यांनी ‘तू लवकर कसा काय आलास, याबाबत त्याला विचारणा केली. त्याबाबतची कोणतीही माहिती देण्यापूर्वीच तो घरातून लगेच गायब झाला होता. त्याची मित्रांकडे आणि गावी शोधाशोध घेऊनही तो कुठेही आढळून आला नाही. अखेर त्याच्या कुटुंबियांनी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची शक्यता वर्तवून तो बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदविली होती. पोलीसांनी त्याचा फोटो आणण्यासाठी सांगितल्यामुळे फोटो घेऊन त्याचे वडील नितिन पाशीरकर हे पोलीस ठाण्यात जात असतांना तो गणपती मंदीराजवळ अचानक त्यांना रात्री ८ वा. च्या सुमारास दिसला. मुलगा पुन्हा सुखरुप मिळाल्याने आई वडीलांनी त्याला जवळ घेऊन कवटाळले. रिक्षात झोपून प्रसंगी उपाशी पोटी राहून परिसरातच वास्तव्य करीत होतो, इतकीच माहिती त्याने कुटुंबियांना दिल्याचे त्याची मामी अवंती तावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अगदी क्षुल्लक कारणावरुन आजी रागावल्याचा राग मनात धरुन तो घराबाहेर पडला होता, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठाण्यातील बेपत्ता मुलगा ५ दिवसांनी सुखरुप परतला
By admin | Updated: December 23, 2014 23:10 IST