Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता पत्रकार हाजी मलंगच्या डोंगरावर

By admin | Updated: February 25, 2016 03:01 IST

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला इंग्रजी वर्तमानपत्रातील पत्रकार सन्निध पुजारी मित्रांसोबत हाजी मलंगच्या डोंगरावरच मुक्कामी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

मुंबई: तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला इंग्रजी वर्तमानपत्रातील पत्रकार सन्निध पुजारी मित्रांसोबत हाजी मलंगच्या डोंगरावरच मुक्कामी असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलुंड परिसरात आईसोबत राहण्यास असलेला पुजारी २१ तारखेपासून घरातून गायब होता. मित्रांसोबत कल्याण येथील हाजी मलंगला जात असल्याची माहिती त्याने आईला दिली होती. मात्र, त्याचा मोबाइल बंद झाल्यामुळे आईचा त्याच्याशी संपर्क तुटला होता. त्यामुळे मुलाच्या काळजीने त्यांनी मंगळवारी मुलुंड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दिली होती. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या मित्र-नातेवाईकांशी संपर्क साधून, ते पुजारीबाबत चौकशी करत होते. तपासअंती त्याच्यासोबत असलेल्या मित्राशी बुधवारी पोलिसांचा संपर्क झाला. तेव्हा पुजारी त्याच्या तीन मित्रांसोबत पिकनिकसाठी हाजी मलंगच्या डोंगरावर थांबला असल्याची माहिती मिळाल्याने आईने सुटकेचा नि:श्वास सोडला. मोबाइल बॅटरी नसल्याने मोबाइल बंद झाला असल्याचे पुजारीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)