Join us  

एचडीएफसीच्या बेपत्ता उपाध्यक्षांची हत्या? एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 5:31 PM

सिद्धार्थ संघवी बुधवारपासून बेपत्ता

मुंबई: एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचा दावा एका आरोपीनं केला आहे. 39 वर्षीय सिद्धार्थ संघवी बुधवारपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या आरोपीनं पूर्ववैमनस्यातून संघवी यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं. मात्र अद्याप पोलिसांना संघवी यांचा मृतदेह सापडलेला नाही. दक्षिण मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू परिसरात राहणारे सिद्धार्थ संघवी बुधवारपासून बेपत्ता झाले. यानंतर शनिवारी त्यांची गाडी नवी मुंबईत सापडली. या गाडीच्या पुढील सीटवर पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या हत्या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संघवी बुधवारी घरी न परतल्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एचडीएफसी बँकेत उपाध्यक्ष पदावर काम करणाऱ्या सिद्धार्थ संघवी यांची कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे भागातील एका इमारतीजवळ शनिवारी आढळून आली. कारच्या पुढील सीटवर रक्ताचे डाग आणि चाकू आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि संघवी यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. मुंबई आणि नवी मुंबईच्या पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.  

टॅग्स :खूनमुंबई