Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईवरील मळभ हटले, राज्याला पावसाचा इशारा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 06:41 IST

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईवर आलेले मळभ शुक्रवारी दुपारी हटले. मात्र राज्यात अवकाळी पावसाचा शिडकावा सुरूच असून, मुंबईतील हटलेल्या मळभामुळे आकाश निरभ्र झाल्याने मुंबईकरांना पुन्हा एकदा उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईवर आलेले मळभ शुक्रवारी दुपारी हटले. मात्र राज्यात अवकाळी पावसाचा शिडकावा सुरूच असून, मुंबईतील हटलेल्या मळभामुळे आकाश निरभ्र झाल्याने मुंबईकरांना पुन्हा एकदा उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुसरीकडे वातावरणातील उल्लेखनीय बदलामुळे १७ मार्च रोजी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर १८ ते २० मार्चदरम्यान संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर येथे ३७.६ तर सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे १६.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भाच्या काही भागात व कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालीआहे. मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपासहोते.१७ मार्च रोजी मुंबईतील आकाश सामान्यत: ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २३ अंशांच्या आसपास राहील.१८ मार्च रोजी मुंबईतील आकाश ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशांच्या आसपास राहील.