Join us  

मृत व्यक्तीची अल्पवयीन मुले ‘पालक संघा’अंतर्गत भरपाईस पात्र; उच्च न्यायालयाचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 8:47 AM

मार्च २०१३मध्ये रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला व दोन अल्पवयीन मुलांना ७५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश वाहन अपघात लवादाने विमा कंपनीला दिले. या आदेशाला विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा अपघात मृत्यू झाल्याने त्याच्या दोन अल्पवयीन मुलांना प्रत्येकी ४० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एका विमा कंपनीला दिले. जेव्हा एखाद्या व्यक्तिचा वेळेपूर्वीच मृत्यू होतो तेव्हा जोडीदाराप्रमाणेच मृत व्यक्तीची मुले पालक संघ या शीर्षकाखाली नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत, असे न्या. भारती डांग्रे यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले. 

मार्च २०१३मध्ये रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला व दोन अल्पवयीन मुलांना ७५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश वाहन अपघात लवादाने विमा कंपनीला दिले. या आदेशाला विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

लवादाने चुकीचे ठोकताळे मांडत ७५ लाख रुपये नुकसान भरपाई भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नुकसान भरपाई केवळ जोडीदाराला देऊ शकतो. मुलांना नाही. मृत व्यक्तीच्या पत्नीने पालक संघांतर्गत मुलांना नुकसान भरपाई देण्याची केलेली मागणी अयोग्य आहे, असा दावा विमा कंपनीतर्फे करण्यात आला. कंपनीच्या युक्तिवादाशी  न्यायालयाने  असहमती दर्शवली.

काय म्हणाले न्यायालय?पालक संघ याचाच अर्थ एखाद्या पालकाच्या नुकसानीमुळे दिलेली मदत असा होतो. जोडीदाराच्या बाबत, त्यात (नुकसान भरपाई) लैंगिक संबंधाचा विचार झाला असेल. पण पालकाचे अचानक निधन झाले असेल तर त्याने पालकाचे प्रेम, जिव्हाळा, शिस्त, संरक्षण गमावलेले असते. त्यामुळे जोडीदारा प्रमाणे मुलेही नुकसान भरपाईस पात्र आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

टॅग्स :उच्च न्यायालय