Join us
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याला अल्पसंख्याकांनी घाबरू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 00:40 IST

नागरिकत्व कायद्याचे समर्थन : गोरेगाव, कांदिवली, मालाडमध्ये जागृती

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ जनजागरण सभेला पश्चिम उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच संमत झालेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय विचारांचा पाठपुरावा करणाऱ्या विविध संघटना एकत्रित आल्या होत्या. अल्पसंख्याकांना घाबरण्याचे काहीच कारण नाही, असा संदेश या सभांमधून देण्यात आला़

शुक्रवारी पश्चिम उपनगरांत एकाच वेळी विविध ठिकाणी या कायद्याच्या समर्थनार्थ अनेक राष्ट्रीय विचारांचे नागरिक एकत्र आले होते. संविधान सन्मान मंच आणि समाजातील जागरूक नागरिकांनी या जनजागरण सभांचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी गोरेगाव (पूर्व), मालाड (पूर्व) आणि कांदिवली (पूर्व) या स्थानकांबाहेर केले होते.

सुधारित नागरिकत्व कायद्याला अपप्रचाराद्वारे होणारा विरोध आणि त्याबद्दल पसरविले जाणारे गैरसमज यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे. हे संभ्रम दूर व्हावेत आणि सुधारित नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी प्रक्रिया यांचा खुल्या मनाने स्वीकार व्हावा यासाठी उपनगरातील विविध जाती-धर्मांचे जागरूक नागरिक एकत्र आले होते. संविधान बचाव मंचातर्फे गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानक येथे सीएए आणि प्रस्तावित सीआरएकरिता गोरेगावच्या रहिवाशांनी समर्थनार्थ घोषणा दिल्या.

या वेळी उपस्थित जमावाला अ‍ॅड. राम शिंदे यांनी ७० वर्षांत पाकिस्तान, बांगलादेशमधील हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती व पारसी यांचे कसे हाल होतात याबाबत सविस्तर माहिती दिली. अ‍ॅड. अपोलो मोघे यांनी पाकिस्तानने भारतातील धार्मिक अल्पसंख्याक यांच्याकरिता अशाच स्वरूपाचा कायदा पास केला तर आम्ही समर्थन करू, असे सांगितले. तर मेहर शेख यांनी देशातील अल्पसंख्याकांनी या कायद्यामुळे मुळीच घाबरण्याचे कारण नाही याचे विवेचन केले. यापुढेही देशहिताच्या विविध कायद्यांचे समर्थन जनतेने करावे, असे आवाहनही केले.