मुंबई : कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत 11 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणा:या चार आरोपींना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अटक केली.
सायन येथील जय भारतमातानगर येथे ही पीडित मुलगी तिच्या काका-काकूंसोबत राहते. सहा महिन्यांपूर्वी याच परिसरात राहणा:या सरवणकुमार जैस्वार (21) या आरोपीसोबत तिची ओळख झाली होती. त्यामुळे रस्त्याने येता-जाता ती त्याच्यासोबत बोलायची. त्यानंतर 16 जूनला त्याने या मुलीला धमकी देत तिचे अपहरण केले. सायंकाळ झाली तरी मुलगी घरी परत न आल्याने तिच्या काकाने याबाबत वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता सरवणकुमारसोबत तिला काही रहिवाशांनी पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत शोध सुरू केला. मात्र तो कधी हरियाणा तर कधी उत्तर प्रदेश अशा राज्यांत मुलीला घेऊन फिरत असल्याने पोलिसांच्या तावडीत येत नव्हता. अखेर 3 सप्टेंबरला हा आरोपी सायन सर्कल येथे येणार असल्याची माहिती वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना समजली. पोलिसांनी या परिसरात सापळा रचून पीडित मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले. दोघांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर चौकशीत मुलीने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
अटकेनंतर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने तिला काही दिवस घाटकोपर येथे राहणा:या राजन जैस्वार या मित्रच्या घरी ठेवले होते. त्यानंतर तिला सिमला, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी नेले. उत्तर प्रदेशात या आरोपीने या मुलीसोबत जबरदस्ती एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर बलात्कार केला. तेथे त्याला सतीशकुमार व सुरिदंर सिंह या दोघांनी मदत केली. सरवणकुमारसह बाकी तिघांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये आणखी तिघांचा समावेश असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)