Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयाचे नवे नाव ‘गुंडालय’

By admin | Updated: February 15, 2017 03:26 IST

भाजपाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमधून गुंडांची माहिती मागितली आणि त्यांना पक्षात घेतले आहे.

मुंबई : भाजपाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनमधून गुंडांची माहिती मागितली आणि त्यांना पक्षात घेतले आहे. त्यामुळे आता मंत्रालयाचे नवे नाव गुंडालय बनणार असून ‘गुंडा मंत्री’ असे नवे खाते असणार आहे. या नव्या खात्याचा कार्यभारही मुख्यमंत्र्यांकडेच असेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या प्रचारसभांमधून शिवसेनेतच सर्वाधिक गुंड उमेदवार असल्याची टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी बोरीवली येथील प्रचारसभेत उत्तर दिले. शिवसेनेकडून मुंबई हिसकावून घेण्यासाठीच आमच्यावर चिखलफेक केली जात आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मुंबईकर आम्हाला सत्ता देतात. तुमचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात की घोटाळ्यांना पालिका अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्याकडून पालिकेचा कारभार समजून घ्या, असा टोलाही ठाकरे यांनी हाणला. लोकांना भूलथापा मारण्यापलीकडे भाजपावाल्यांनी दुसरे काही केले आहे का, असा सवाल करताना भाजपावाले फक्त गाजर दाखवतात, देत काहीच नाहीत. ‘केडीएमसी’ला साडेसहा हजार कोटी देण्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात काही दिले नाही. बिहारला सव्वा लाख कोटी देणार होते, कुठे गेले ते, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)