Join us  

मंत्रालयीन कर्मचाऱ्याच्या मुलीला अनोळखी मैत्री पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 2:25 AM

मंत्रालयातील कर्मचा-याच्या अनोळखी मैत्री भलतीच महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या परदेशी तरुणाने महागड्या भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले.

मुंबई : मंत्रालयातील कर्मचा-याच्या अनोळखी मैत्री भलतीच महागात पडली आहे. इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या परदेशी तरुणाने महागड्या भेटवस्तू पाठविल्याचे सांगितले. याच वस्तूंवरील कस्टम ड्युटीच्या नावाखाली तिच्याकडून ३ लाख १९ हजार ५०० रुपये उकळल्याचा प्रकार कुर्ल्यामध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार २४ वर्षीय रेश्मा (नावात बदल) कुर्ला परिसरात राहते. तिचे वडील मंत्रालयात शिक्षण खात्यात नोकरीला आहेत. रेश्मा चर्चगेट येथील नामांकित कॉलेजमधून एलएलबीचे शिक्षण घेत आहे. १३ जानेवारी रोजी तिला इन्स्टाग्राम अकाउंटवरून अलसेईयो बेनी याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तिने ती स्वीकारली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. बेनीने तो युनायटेड किंगडम येथे राहत असून, एका जहाजावर मरिन इंजिनीअर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. तिचाही त्याच्यावर विश्वास बसला. दोघेही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सतत संवाद साधू लागले.याच दरम्यान २१ जानेवारी रोजी बेनीने तिला सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ, आयपॅड, अ‍ॅपल कंपनीचा लॅपटॉप, आयफोन, बॅग, बुट, कपडे, हॅन्ड बॅग, परफ्युम इत्यादी भेटवस्तू म्हणून पाठविल्याचे सांगितले. भेटवस्तूचे फोटो त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. कस्टम ड्युटी भरून वस्तू ताब्यात घेण्यास सांगितले, तसेच कस्टम ड्युटी म्हणून ६५ हजार रुपये भरण्यास सांगितले. पुढे, गिफ्टमध्ये पाउंड चलनाचे १ हजार रुपये रोख मिळाल्याचे सांगून, खात्यात २ लाख ५४ हजार ५०० भरावे लागतील, असे सांगितले. ३१ जानेवारी रोजी तिने ती रक्कम जमा केली. पुढे त्याने आणखी, ५ लाख ८६ हजार ९२० रुपये भरण्यास सांगताच, रेश्माला संशय आला. मात्र, तोपर्यंत रेश्माने एकूण ३ लाख १९ हजार ५०० रुपये ठगांच्या खात्यात जमा केले होते.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तिने आधी दिलेल्या पैशांची पावती देण्यास सांगितले. मात्र, तिला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. बेनीने संपर्क तोडल्याने, तिने गुरुवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :धोकेबाजी