मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालार्पयत पुढील दोनएक दिवस मुंबईतील वातावरण थंड राहणार असले तरी गेल्या 15 दिवसांपासून सरासरी 34 अंशावर पोहोचलेल्या कमाल तापमानाने मुंबईकरांचा जीव नकोसा केला आहे. गुरुवारी कमाल तापमान 37 अशांवर गेल्याने हैराण झाले आहेत. या महिन्यातील हा उच्चंक आहे.
मान्सून आता मुंबईसह महाराष्ट्रातून पूर्णत: माघारी परतला असून, ऑक्टोबर हिटने मुंबईकरांना चांगलेच चटके दिले आहेत. विशेषत: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच पडलेल्या उन्हाने मुंबईकरांना दमवून टाकले असून, वाढत्या उकाडय़ाने तर मुंबईकर अक्षरश: घामाने चिंब भिजून गेले आहेत. मागील 15 दिवसांतील कमाल तापमानाचा पारा पाहता हे तापमान 34 अंशाच्या खाली उतरलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे किमान तापमानदेखील 28 अंशाच्या घरात नोंदविण्यात येत असून, रात्रीच्या वातावरणातदेखील उकाडा
निर्माण झाल्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
दरम्यान, दुपारी समुद्राहून जमिनीकडे वाहणा:या दमट वा:यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत असला तरीदेखील वाढते ऊन कमी होत नसल्याने मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत मुंबईत सायंकाळी अथवा रात्री पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 37, 25 अंशाच्या आसपास राहील. (प्रतिनिधी)