Join us

गिरणी चाळ भाडेकरूंना हवी मोठी घरे संघर्ष कृती समितीची एनटीसीकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 06:11 IST

गिरणी चाळीतील भाडेकरूंना नवीन वाढीव चटईक्षेत्र कायद्यान्वये मोठी घरे देण्याची मागणी गिरणी चाळ भाडेकरू संघर्ष कृती समितीने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे (एनटीसी) केली आहे.

मुंबई : गिरणी चाळीतील भाडेकरूंना नवीन वाढीव चटईक्षेत्र कायद्यान्वये मोठी घरे देण्याची मागणी गिरणी चाळ भाडेकरू संघर्ष कृती समितीने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडे (एनटीसी) केली आहे. आता गिरण्या असलेल्या जागेवरच भाडेकरूंचे पुनर्वसन करावे, असेही संघर्ष कृती समितीचे म्हणणे आहे.राष्ट्रीयीकृत गिरण्यांमधील काही दुकानदारांना मार्च २०१८पर्यंत गाळे रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व दुकानदारांना राज्य सरकारच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार संरक्षण देण्याची मागणी या वेळी संघर्ष समितीने केली आहे.या दोन प्रमुख मागण्यांवर एनटीसीने तत्काळ कारवाई करण्याचे आवाहनही कृती समितीने केले आहे. अनेकदा मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल समितीने नाराजीही व्यक्त केली आहे.मागण्यांची दखल घेत एक महिन्याच्या आत एनटीसीने कार्यवाही केली नाही, तर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी दिला आहे.