Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गिरणी कामगारांसाठी संघटना लढा देणार

By admin | Updated: July 28, 2015 03:11 IST

मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर म्हाडामार्फत २0१0-२0११ मध्ये कामगारांकडून माहिती संकलनाचे अर्ज भरून घेण्यात आले.

मुंबई : मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर म्हाडामार्फत २0१0-२0११ मध्ये कामगारांकडून माहिती संकलनाचे अर्ज भरून घेण्यात आले. परंतु काही कारणांमुळे हे अर्ज भरू न शकलेल्या कामगारांचे माहिती संकलनाचे अर्ज भरून घ्यावेत, यासाठी गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघटना लढा उभारणार आहे.गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आणि त्यांच्या वारसांना घरे देण्यासाठी म्हाडामार्फत माहिती संकलनाचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यानुसार १ लाख ४८ हजार ६७ गिरणी कामगारांनी म्हाडाकडे अर्ज केले आहेत, तर काही कामगारांना अपरिहार्य कारणांमुळे अर्ज भरता आले नाहीत. या कामगारांनाही घराचा हक्क मिळावा यासाठी संघटनेने प्रयत्न सुरू केले आहेत. या कामगारांना अर्ज भरण्याची संधी द्यावी, यासाठी कल्याणकारी संघटनेने रविवार २६ जुलै रोजी म्यु. शाळा, तालचेकर वाडी, लोअर परेल येथे सभा घेतली. या सभेत कल्याणकारी संघटनेने संघटनेसोबत राहून पुढील लढ्याची प्रतिज्ञा केली.माहिती संकलनाचे अर्ज भरू न शकलेल्या ३६0 गिरणी कामगारांकडून कल्याणकारी संघटनेने अर्ज भरून घेतले आहेत. या कामगारांनाही गिरणी कामगारांच्या लॉटरीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांना माहिती संकलन अर्ज भरण्याची संधी द्यावी, अशी मागणी संघटनेने मुख्यमंत्री आणि म्हाडाकडे केली होती. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे संघटनेने सरकारविरोधात लढा देण्याची तयारी सुरू केली आहे.सर्व गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी गिरणी कामगार संघटना आंदोलने करीत आहेत. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत १0 हजार घरांची आणि २0१६ मध्ये ८,७१0 घरांची सोडत काढण्याचे आश्वासन दिले आहे. माहिती संकलनाचे अर्ज भरू न शकलेल्या कामगारांनाही या सोडतीत सामावून घ्यावे अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे चिटणीस हेमंत राऊळ यांनी दिला आहे.