Join us

घरांसाठी गिरणी कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:25 IST

राज्यातील गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्नावर आक्रमक होत

मुंबई : राज्यातील गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्नावर आक्रमक होत विविध प्रकारे शासनावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यात गिरणी कामगार एकजूट संघटनेने बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढून गिरणी कामगारांच्या घरांसह पुनर्वसन करण्याची मागणी केली. तर राष्ट्रीय मिल मजदूर संघासह कामगार संघटना कृती संघटनेने वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्य कार्यालयाबाहेर गुरुवारी निदर्शने करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.हक्काच्या घरासाठी ज्या कामगारांना पात्र ठरविण्यात आले होते, त्यांना अपात्र व अपात्र कामगारांना पात्र ठरविण्यात आल्याचा गंभीर आरोप संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी भविष्य निर्वाह निधीचे खोटे प्रमाणपत्र जोडल्याचा प्रकारही समोर आल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. अपात्र कामगारांची संख्या २ हजारांपर्यंत पोहोचली आहे. तरी या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.गिरणी कामगारांना घरे देऊन पुनर्वसन करण्याचा ठोस विचार करावा. एका महिन्यात पथदर्शक धोरण जाहीर करतो, असे मुख्यमंत्र्यांनी मागच्या अधिवेशनात सांगितले होते. दरम्यान, गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. मागण्यांवर विचार करून बैठक घेतली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे.