Join us
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगार कोट्यातून घर मिळवून देतो! वृद्धकडून पैसे उकळत फसवले

By गौरी टेंबकर | Updated: December 3, 2023 18:20 IST

- दिंडोशी पोलिसात गुन्हा दाखल.

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या एका गिरणी कामगाराची फसवणूक घराची ऑर्डर आणून देतो असे सांगत परिचित महिलेसह दोघांनी करत पैसे उकळले. याप्रकरणी दिंडोशी पोलिसात त्यांनी तक्रार दिल्यावर संबंधित कलमांतर्गत दिंडोशी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

तक्रारदार सुरेश आंबेकर (७५) हे खटाव मिल मध्ये कार्यरत होते जी नंतर बंद पडली. ते सध्या नागरी निवारा परिसरात त्यांची पत्नी शिला (६५) यांच्यासह राहतात. त्यांनी दिंडोशी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता शीला यांची परिचित असलेली महिला जयश्री देशमुख ही तिचा साथीदार योगेश गायकवाड याच्यासोबत त्यांच्या घरी आली. त्या दोघांनी आंबेकर यांना तुम्हाला मिल कामगार कोट्यातून रूम मिळवून देतो असे सांगत त्यांच्याकडून १२ हजार ५०० रुपये घेतले. पैसे घेतल्यावर २ ते ३ दिवसात रूमची ऑर्डर तुम्हाला आणून देतो असे म्हणत तो निघून गेला. पैशांचा व्यवहार करताना आंबेकर यांचे मित्र विजय पुरेहित हे घरी उपस्थित होते.

मात्र पैसे देऊन दोन महिने उलटले तरी देखील त्यांना रूमची कोणतीही ऑर्डर आणून दिली गेली नाही. तसेच या दुकलीने घेतलेले पैसेही परत केले नाही. त्यामुळे आंबेकर यांनी गायकवाड याला फोन केला. त्यावर त्याने मला फोन करू नका नाहीतर तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि आंबेकर यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गायकवाड आणि त्याची साथीदार देशमुख यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४,४०६,४२० आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

...अशी ऑर्डर निघत नाही

आंबेकर यांनी गायकवाडला पैसे दिल्यानंतर महिनाभरापूर्वी ते वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात घराच्या ऑर्डरच्या चौकशीसाठी  गेले होते. तेव्हा घराची अशी ऑर्डर म्हाडातून निघत नाही, त्यासाठी आधी लॉटरी निघते असे मार्गदर्शन संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना केले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.

...म्हणून गुन्हा दाखल करवला

हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांचा गेली कित्येक वर्षं लढा सुरू असून स्वतःचे घर मिळण्याचे स्वप्न पाहत अनेक कामगारांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आतुरतेने घर लागेल याची वाट पाहणाऱ्या आमच्या सारख्या लोकांची देशमुख आणि गायकवाड सारखी माणसे फसवणूक करत आहेत. माझ्याकडून उकळलेली रक्कम जरी लहान असली तरी मी फसलो म्हणून अन्य कोणासोबत असे घडू नये त्यासाठी मी दिंडोशी पोलिसात तक्रार करत गुन्हा दाखल करवला. (सुरेश आंबेकर - तक्रारदार, गिरणी कामगार )

टॅग्स :धोकेबाजी