मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटना आक्रमक झाली आहे. गिरणी कामगारांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप या राजकीय पक्षांनी समितीच्या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सरकारवर दबाव वाढणार आहे.गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांसाठी सहा कामगार संघटना एकत्र येऊन गेल्या पाच वर्षांपासून लढा देत आहेत. कामगार संघटनांच्या लढ्यामुळे ६ हजार ९२५ गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळाले आहे. परंतु उर्वरित गिरणी कामगारांच्या घरांबाबत सरकार संवेदनशील नसल्याची भावना कामगारांमध्ये वाढीस लागली आहे. १६ गिरण्यांची जमीन सरकारकडे उपलब्ध असतानाही १0 गिरण्यांच्या जागेवर बांधकाम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले नाहीत. तसेच एमएमआरडीएच्या घरांचा प्रश्नही मार्गी लागत नसल्याबद्दल कृती संघटनेने १ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर धडक दिली.त्यानंतर संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. हे आश्वासनही न पाळल्याने गिरणी कामगार आक्रमक झाले आहेत. यासाठी बुधवार १५ जुलै रोजी सकाळी १0 वाजता राणीबाग, भायखळा येथून विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार समितीने केला आहे. या मोर्चाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे, कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी सांगितले.
गिरणी कामगार कृती समिती आक्रमक
By admin | Updated: July 13, 2015 01:46 IST