Join us  

दुधाचे दर २ रुपयांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 1:20 AM

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुटवळ यांनी सांगितले की, बाजारामध्ये दुधाच्या दोन प्रकारच्या किमती असून एक किंमत ४४ रुपये तर दुसरी किंमत ४२ रुपये आहे.

मुंबई : राज्यभरातील दूध उत्पादकांनी दोन रुपये दरवाढ केल्याने प्रति लीटर ग्राहकांना आता ४४ रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दुधासाठी ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. दूध व्यवसायातील डिलर रेट आणि किंमत यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत दोन रुपयांनी कमी केली जाईल, म्हणून राज्यातील दूध उत्पादकांनी दुधाचे भाव दोन रुपयांनी वाढविले आहेत.

दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुटवळ यांनी सांगितले की, बाजारामध्ये दुधाच्या दोन प्रकारच्या किमती असून एक किंमत ४४ रुपये तर दुसरी किंमत ४२ रुपये आहे. आता ज्यांच्या दुधाची किंमत ४२ रुपये आहे. ती ४४ रुपये होणार असून ज्या कंपनीच्या दुधाची किंमत ४४ रुपये आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. तसेच ८० टक्के दूध विके्रते ४४ रुपये प्रमाणे दूध विक्री करणारे आहेत. राज्यात २५ ते ३० टक्के दुधाची कमतरता आहे. दूध व्यवसायामध्ये किंमत आणि डिलर रेट यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे ज्या उत्पादकांचा दुधाचा भाव ४४ रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्या दुधाचा दर वाढणार आहे. परिणामी सध्या बाजारात दुधाची किंमत ४४ रुपये ही एकच राहणार आहे. अमुल दुधाची किंमत ४२ रुपये होती, आता ती ४४ रुपये झाली आहे. मोठ्या कंपन्यांच्या डिलरचे मार्जिन कमी असते. परंतु खासगी व्यावसायिकांच्या स्पर्धांमध्ये डिलरचे मार्जिन जास्त आहे. डिलर रेट आणि किंमत यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत दोन रुपयांनी भरून काढली जाईल.

कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सीताराम दीक्षित यांनी सांगितले की, एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यावर शेतकरी किंवा ग्राहक ग्रस्त होतो. जी दरवाढ होते त्याचे पैसे कोणाला मिळतात, याचा मागोवा घेणे गरजेचे आहे. दरवाढ झाल्यावर शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात आणि इतरांना किती पैसे मिळतात हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नाही, म्हणून सरकार वस्तूमध्ये दरभाव करते. परंतु, काही दिवसांनी पुन्हा दरवाढीचे रडगाणे सुरू होते. पाच ते दहा वर्षांपूर्वी दुधाचे दर २० रुपयांप्रमाणे होते. आता ते ४०-४५ रुपयांपर्यंत गेले असूनही शेतकरी म्हणतो चांगला भाव मिळत नाही.

टॅग्स :दूध