Join us
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळामुळे गिधाडांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लांब चोचीच्या श्रीवर्धन, म्हसळा परिसरातील पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या संख्येत तुलनात्मक ३४ टक्क्यांनी, तर महाड, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लांब चोचीच्या श्रीवर्धन, म्हसळा परिसरातील पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या संख्येत तुलनात्मक ३४ टक्क्यांनी, तर महाड, कोलाड, वाकण व सुधागड (पाली) या परिसरांतील लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येत तुलनात्मक १८ टक्के घट दिसून आली आहे. जागतिक वन दिनानिमित्त महाराष्ट्रात प्रथमच सिस्केप व रोहा वन विभाग - वन परिक्षेत्र महाड, माणगाव, पाली, श्रीवर्धन, म्हसळा यांच्या वतीने गिधाडगणना घेण्यात आली. यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

भारतात गिधाडांच्या ९ प्रजाती आढळतात. त्यापैकी पांढऱ्या पाठीचे व लांब चोचीचे गिधाड या दोन प्रजाती रायगड जिल्ह्यात बहुतांश आढळतात. रायगड जिल्ह्यात २५ ते ३० वर्षांपूर्वी ९९ टक्के संपुष्टात आलेल्या गिधाडांच्या संख्येत पुढील दहा ते पंधरा वर्षांत सिस्केपच्या प्रयत्नांमुळे कमालीची वाढ झाल्याचे दिसून आली. प्रेमसागर मेस्त्री यांच्या सिस्केप संस्थेने यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या वर्षीपर्यंत ही संख्या ३०० ते ३५० पर्यंत गेल्याचे अनेक वेळा अन्नपुरवठा करतेवेळी नोंदली गेली.

लॉकडाऊनच्या कालावधीत बंद वाहतुकीमुळे अन्नपुरवठा होऊ शकला नाही. निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन, म्हसळा, तळा या भागांतील नारळाची असंख्य झाडे, डोंगरावरील उंच झाडे यांच्या पडझडीत गिधाडांची अनेक घरटी उद्ध्वस्त झाली. या काळात शोधूनही गिधाड दिसत नव्हते; कारण या काळात प्रचंड भीतीने ते कुठेतरी दबा धरून बसले होते. काही दिवसांनंतर म्हसळ्याऐवजी चांदोरे परिसरातील त्यांचे नव्याने वास्तव्य लक्षात आले होते. तर काहींनी स्थलांतर केले असावे, असा अंदाज सिस्केप संस्थेच्या वतीने वर्तवण्यात आला. यामुळेच पुन्हा एकदा गिधाडगणना व्हावी, असे मत पुढे आले.