लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला असतानाच मिठी नदीनेही नागरिकांना धडकी भरवली आहे. कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार येथून वाहणाऱ्या मिठी नदीची पातळी ३.९० मीटर एवढी नोंदविण्यात आली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील क्रांती नगरमधील २५० रहिवाशांना जवळच्या पालिकेच्या शाळेत हलविण्यात आले होते. दुपारी मिठी नदीची पाणीपातळी ओसरल्यानंतर रहिवासी पुन्हा आपल्या घरी परतले.
थोडी जरी अतिवृष्टी झाली तरी मिठी नदीकाठच्या रहिवाशांना धडकी भरते. कारण २६ जुलैच्या पुराच्या स्मृती आजही या रहिवाशांच्या डोळ्यासमोरून जात नाहीत. केवळ क्रांती नगरच नाही तर अंधेरी पूर्वेकडील साकीनाका, मरोळ, जरीमरी, सफेद पूल, कुर्ला येथील संदेश नगर, सहयोग नगर, वाडिया इस्टेट, क्रांती नगर, हनुमान चाळ, समर्थ चाळ, टिचर्स कॉलनी, सीएसटी हायवे, कालिना ब्रीज, सांताक्रूझ, वाकोला परिसरासह माहीम व संपूर्ण मुंबईला २६ जुलैच्या पुराचा फटका बसला होता. मात्र, ढिम्म प्रशासन, सुस्त लोकप्रतिनिधींमुळे परिस्थितीत अजूनही फार काही बदल झालेला नाही. मिठी नदी आजही गाळात रुतलेली असल्याने मिठी नदीकाठी राहणाऱ्या लोकांचा जीव प्रत्येक पावसाळ्यात टांगणीला लागलेला असतो.