Join us
Daily Top 2Weekly Top 5

गळतीमुळे ठिकठिकाणी प्रवासी हैराण

By admin | Updated: June 15, 2015 23:23 IST

रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून एलटीटी स्थानकात लाखो लीटर पाण्याचे सेव्हिंग करणाऱ्या प्रशासनाने ऐतिहासिक ठाण्यासाठी कोणताही प्रकल्प राबविलेला नाही.

अनिकेत घमंडी , डोंबिवली रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून एलटीटी स्थानकात लाखो लीटर पाण्याचे सेव्हिंग करणाऱ्या प्रशासनाने ऐतिहासिक ठाण्यासाठी कोणताही प्रकल्प राबविलेला नाही. दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे स्थानकातील फलाटांमध्ये छप्पर फाडके पाणी पडत आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बरच्या बहुतांशी स्थानकांमध्ये अशीच स्थिती असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. लोकलचे छत, खिडक्या-दरवाजांमध्येही गळती असल्याने एरव्ही विडोंसीटसाठी सहप्रवाशाची गचांडी पकडणारे प्रवासी ती नको रे बाबाची भूमिका घेत आहेत.ठाण्यातील फलाट २, ३, ४ आणि ५-६ तसेच ट्रान्स-हार्बरच्या ९/१० या फलाटांवरील छताला भगदाड पडल्याने पावसाचे पाणी बदाबदा पडत होते. यामुळे कल्याण-मुंबईच्या दिशांकडे उभ्या असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांतही असेच दृश्य होते. मुलुंड-भांडुप आणि कुर्ल्यातही अशाच गळतीमुळे प्रवासी त्रस्त झाले असल्याचे सांगण्यात आले. ठाण्याएवढी केविलवाणी अवस्था मात्र अन्यत्र कुठेही नसल्याचे निदर्शनास आले. त्यावरूनच स्थानकातील स्वच्छतेसह आपत्कालीन यंत्रणा मात्र फोल ठरल्याची टीका होत आहे. चार वर्षांपासून फलाट क्रमांक २, ३ आणि ५ या स्थानकांमध्ये छतांची कामे सुरूच असून ती पूर्ण कधी होणार? मधल्या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी छत काढले, तेव्हापासून अद्याप ते टाकले का नाही, असा सवालही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला विचारला. मात्र, त्यावर प्रशासनाने कामे लवकरच केली जातील, असे उत्तर देऊन हात वर केले. या सर्व बकाल अवस्थेसह अन्य गैरसोयींच्या तक्रारी आल्याने खासदार विचारे सोमवारीच महाव्यवस्थापकांना भेटण्यास गेले होते.इथे टपकते पाणी : ठाण्यात फलाटांसह पादचारी पुलांच्या पन्हाळ्या फुटलेल्या आहेत. आसनांच्या ठिकाणी, स्वच्छतागृहाकडे जाताना, तिकीटघराजवळ तसेच अन्य ठिकाणी तसेच कळव्यात फलाट २ वर, मुंब्य्रातही अशीच स्थिती आहे. दिव्यात पादचारी पुलाचे काम सुरू आहे. तेथे तिकीटघर, स्वच्छतागृह, जीआरपी कार्यालय येथेही हिच स्थिती आहे. अजूनही उग्र दर्पच : स्थानकातील गटारांची स्वच्छता न झाल्याने त्या घाण पाण्यातून उग्र दर्प येत असून ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन माजी खासदार आनंद परांजपे यांनी नातेवाइकांना सोडायला आल्याचे निमित्त करून पाहणी केली होती. परंतु, तिचाही काहीही उपयोग झाला नाही.