म्हसळा : तालुक्यातील खामगाव गौळवाडीतील दगडू गुणाजी लाड यांच्या वाड्यामधील बांधलेल्या बैलालाच बिबट्याने आपले लक्ष्य करुन फस्त केल्याची घटना घडली. लाड यांचा वाडा त्यांचे घराचे मागील बाजूलाच असून वाड्यात बांधलेला ४ वर्षांचा सुमारे ५ हजार किमतीचा बैल बिबट्याने हल्ल्यात मारला गेल्याची तक्रार लाड यांनी वनविभागाकडे केली असल्याचे खामगावचे वनपाल बाळकृष्ण गोरनाक यांनी सांगितले. वाघ एवढा भुकेलेला होता की त्याने तो वाड्याबाहेरच फस्त केल्याचे समजते. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात सुमारे ५६३५ हेक्टर वनक्षेत्र आहे तर त्यात बहुतांश वन्यजीव व श्वापदे आहेत. मागील वर्षांचा आढावा घेतला तर बहुतांश वन्यजीव व श्वापदे जंगलात राहण्यापेक्षा नागरीवस्तीच्या जवळपास राहूनच आपले भक्ष्य मिळविण्यास प्राधान्य देत आहेत. तालुक्यात मागील तीन वर्षांत बिबट्याने २९ गायवर्गीय जनावरांना आपले भक्ष्य केले. त्यासाठी वनविभागाने सुमारे १ लक्ष ६६ हजार ८७५ रुपये शेतकर्यांना नुकसानभरपाई दिली. वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेतीमालाच्या नुकसानीचे २०११-१२ मध्ये ६६ हजार, २०१२-१३ रु. ३१ हजार ५००, २०१३-१४ मध्ये रु. ६९ हजार ३७५ नुकसान भरपाई दिल्याची नोंद आहे. त्यामुळे शेतकरी-बागायतदार दिवसेंदिवस पीक घेण्याचे बंद अगर कमी करीत असल्याचे या भागातील जि.प. सदस्या वैशाली सावंत यांनी अभ्यासूपणे सांगितले. संपूर्ण तालुक्यात किमान ८-१० बिबटे असावेत असा अंदाज आहे. (वार्ताहर)
म्हसळ्यात बिबट्याचा पुन्हा संचार सुरू
By admin | Updated: May 27, 2014 02:21 IST