तेजस वाघमारे, मुंबईगेली अनेक वर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत भाडे न भरता राहणाऱ्या फुकट्या रहिवाशांना धक्का देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. १५ दिवसांत भाडे न भरल्यास भाडे थकविणाऱ्या रहिवाशांच्या खोलीचे वीज आणि पाणी कापण्याचा निर्धार म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने केला आहे. यासाठी मंडळामार्फत गुरुवारपासून भाडे भरा अभियान सुरू करण्यात येणार आहे.म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाची मुंबईत ५६ संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये २२ हजार गाळे असून, त्यामध्ये ८ हजार ५०० रहिवासी अनधिकृतपणे राहत आहेत. अनधिकृत गाळेधारकांकडून म्हाडा ३ हजार, तर पात्र गाळेधारकांकडून ५00 रुपये भाडे आकारण्यात येत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून संक्रमण शिबिरांतील गाळेधारक भाडे न भरता बिनधास्तपणे राहत आहेत. या इमारतींच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मंडळाला वर्षाला लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे मंडळाला निधीची कमतरता जाणवू लागली आहे.संक्रमण शिबिरातील अनधिकृत रहिवाशांना कायम करण्याचे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून सरकार दरबारी रखडले आहे. संक्रमण शिबिरात राहत असलेल्या अनधिकृत रहिवाशांनी २0१0 पासून म्हाडाकडे कोणतेही भाडे भरलेले नाही. या रहिवाशांकडून थकीत भाडे वसूल करण्यासाठी मंडळाने हालचाल सुरू केली असून, यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानानुसार प्रत्येक संक्रमण शिबिराबाहेर ‘भाडे भरा’ अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे बॅनर लावण्यात येणार आहेत. रहिवाशांनी १५ दिवसांत गाळ्याचे भाडे न भरल्यास खोलीची वीज आणि पाणी कापण्यात येणार असल्याची सूचना रहिवाशांना देण्यात येणार असल्याचे मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. रामास्वामी यांनी सांगितले.
म्हाडाचे ‘भाडे भरा’ अभियान
By admin | Updated: January 12, 2015 02:17 IST