Join us  

Mhada House Price: विरार बोळिंजमधील म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 1:04 AM

Mhada Update: विजेत्यांनी म्हाडाकडे केलेल्या मागणीनुसार किमान चाळीस हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत.

मुंबई : विरार बोळिंज येथील म्हाडाच्या घरांची गेल्या वर्षी सोडत काढण्यात आली होती. या घरांच्या किमती आता कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. विजेत्यांनी म्हाडाकडे केलेल्या मागणीनुसार किमान चाळीस हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. कमी करण्यात आलेली रक्कम विजेत्याला परत न करता सेवा शुल्काच्या रूपाने वळवून घेण्याचा विचार म्हाडामार्फत करण्यात येत आहे.गेल्या वर्षी म्हाडाने काढलेल्या लॉटरीमध्ये विरारमधील ३ हजार ९०० घरे होती. यापैकी आठशे घरांची पात्रता आतापर्यंत निश्चित झाली आहे. उर्वरित घरांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडातर्फे विषेश मोहीम राबविण्यात येत आहे. विरार बोळिंज येथील खासगी विकासक देत असलेल्या सदनिकांच्या किमतीच्या तुलनेमध्ये म्हाडाच्या सदनिकांची किंमत जास्त असल्याने या घरांचा ताबा घेण्याऐवजी ती परत करण्याचा ओघ सुरू होता. इतर विकासक देत असलेल्या सोयीसुविधा म्हाडा देत असूनही सर्वसामान्य खाजगी विकासकाकडे जात असल्याने अखेर म्हाडाने घरांच्या किमतींत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विजेत्यांचा फायदा होणार आहे. पात्रता निश्चित होतानाच सोडतीतील विजेत्यांना सुधारित रकमेनुसार देकारपत्र देण्यात येणार आहे. याबाबत संबंधित बँकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. घरांसाठी कर्ज देणाऱ्या बँकांनाही कर्जातील रकमेतील बदलांविषयी माहिती दिली जाणे आवश्यक आहे. गृहकर्ज देणाºया बँकांना नवीन बदलाची माहिती म्हाडाने पत्राद्वारे कळविली आहे. म्हाडाकडून गृहकर्ज घेतलेल्या विकेत्यांना तसे पत्र लवकरच पाठविण्यात येणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :म्हाडाविरार