Join us  

म्हाडाचे घर दहा वर्षे विकता येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 4:12 AM

प्राधिकरणाच्या येत्या बैठकीत प्रस्ताव; नियमाचे उल्लंघन केल्यास जप्तीची कारवाई

मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडामार्फत परवडणाऱ्या किमतीत घरे बांधण्यात येतात. या माध्यमातून अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र, ही कमी किमतीतील घरे अनेकजण विकतात. याची दखल घेत पाच वर्षांपर्यंत घर विकता येणार नाही, अशी अट म्हाडाने घातली आहे. आता ही अट दहा वर्षांची करण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी प्राधिकरणासमोर ठेवला आहे. येत्या प्राधिकरणाच्या बैठकीत यावर चर्चा होईल, तसेच दहा वर्षांमध्ये जर कोणी घर विकले, तर ते जप्त करण्याचा ठरावही विचाराधीन असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.म्हाडाचे घर ताब्यात आल्यानंतर अनेक जण ते विकतात. पैशांचे आमिष दाखवून दलालांमार्फतही घरे विकण्यात येतात. अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी घर ताब्यात दिल्यानंतर दहा वर्षांपर्यंत विकता येणार नाहीत, अशी अट ठेवण्यात येणार असल्याचे चव्हाण म्हणाले. सर्वसामान्यांना घरे परवडावीत, म्हणून म्हाडामार्फत कमी किमतीत घरे बांधण्यात येतात. काही योजनांसाठी अनुदानही देण्यात येते. मात्र, अनेकांनी याचा गैरफायदा घेत आर्थिक हेतू साध्य केल्याने, आता ही मुदत वाढवून दहा वर्षांपर्यंत घर विकता येणार नसल्याचे चव्हाण म्हणाले. जर दहा वर्षांच्या आत कुणी घर विकण्याचा प्रयत्न केल्यास, ते जप्त करण्याचा ठराव म्हाडा बोर्डाकडे विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :म्हाडा