Join us

‘म्हाडा’चे ई-बिलिंग : कंझ्युमर क्रमांक शोधता शोधता गाळेधारकांच्या नाकीनऊ आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘म्हाडा’च्या गाळेधारकांना सेवा शुल्क ऑनलाईन भरता यावे म्हणून प्राधिकरणाने ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ केला असला, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘म्हाडा’च्या गाळेधारकांना सेवा शुल्क ऑनलाईन भरता यावे म्हणून प्राधिकरणाने ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ केला असला, तरी पहिल्याच टप्प्यात गाळेधारकांना कंझ्युमर क्रमांकाने हैराण केले आहे. कंझ्युमर क्रमांक नेमका कोणता? या प्रश्नाने गाळेधारक त्रस्त असून, आता यावर उपाय म्हणून म्हाडा प्रत्येक गाळेधारकाला नव्याने सेवा शुल्काची पावती देणार आहे. या पावतीवर कंझ्युमर क्रमांक राहणार असून, ही पावती प्रत्येक गाळेधारकाला केव्हा प्राप्त होईल? याबाबत मात्र अद्याप पुरेशी स्पष्टता नाही. दरम्यान, सेवा शुल्काची माहिती गाळेधारकांना देता यावी म्हणून म्हाडा आता गाळेधारकांचे भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा गोळा करणार आहे.

ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ झाला आणि सेवा शुल्क भरण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर गाळेधारकांच्या अक्षरश: उड्या पडल्या. मात्र, सुरुवातच कंझ्युमर क्रमांकाने होत असल्याने तो कुठून आणायचा? असा प्रश्न गाळेधारकांना पडला. यासाठी अनेक गाळेधारकांनी म्हाडाच्या कार्यालयात फोन केले. मात्र, त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबाबतचे अनेक प्रश्न ‘लोकमत’च्या वाचकांनीदेखील लोकमत प्रतिनिधीला विचारले. कंझ्युमर क्रमांक म्हणजे पावती क्रमांक का? तो कसा आणि कुठे मिळणार? नवे सेवा शुल्काचे बिल कधी मिळणार? ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदच म्हाडाकडे नसेल तर गाळेधारकांना अपडेट माहिती कशी मिळणार? अशा अनेक प्रश्नांचा यात समावेश होता. यावर ‘लोकमत’ने नक्की ही प्रक्रिया कशी असणार आहे? याची माहिती म्हाडाला विचारली असता, आता गाळेधारकांना नव्याने पाठविण्यात येणाऱ्या सेवा शुल्काच्या बिलावर कंझ्युमर क्रमांक असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले. शिवाय ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करणार असल्याचेदेखील सांगितले. आता ही नवी बिले गाळेधारकांना केव्हा मिळतील? याबाबत मात्र पुरेशी स्पष्टता नसल्याचे देखील म्हाडाकडून सांगण्यात आले.

ई-बिलिंग संगणकीय प्रणालीच्या सेवेमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना घरबसल्या सेवा शुल्क अदा करता येणार आहे. अभय योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या गाळेधारकांकरिताही या प्रणाली अंतर्गत सेवा शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. २३ वर्षांपासून प्रलंबित राहिलेला प्रश्न तडीस नेऊन सेवा शुल्काच्या रकमेवरील व्याज पूर्णतः माफ करण्यात आले आहे. ई-बिलिंग संगणकीय प्रणालीचा मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतींमधील सुमारे १ लाख ४६ हजार गाळेधारकांना फायदा होणार आहे.

- म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे सेवा शुल्काच्या वसुलीकरिता एप्रिल २०२१पासून अभय योजना राबविण्यात आली.

- या योजनेंतर्गत १९९८ ते २०२१पर्यंतचे संपूर्ण व्याज माफ करुन या काळातील मुद्दल पाच वर्षांत दहा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.

- एकरकमी सेवा शुल्क भरू इच्छिणाऱ्या गाळेधारकांना विशेष सवलत आहे.

- गाळेधारकांना सेवा शुल्काचे देयक त्यांच्या ई-मेलवर प्राप्त होणार आहे.

- देयकाबाबत एसएमएस स्वरुपात संदेश प्राप्त होणार आहे.

- गाळेधारकांच्या सेवा शुल्क देयकाविषयी तक्रारींकरिता ई - बिलिंगच्या संकेतस्थळावर मिळकत व्यवस्थापननिहाय मेल बॉक्स उपलब्ध आहे.