Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा लावणार दोन लाख झाडे, झाडांना जिओ टॅग; देखभाल गृहनिर्माण संस्था करणार

By सचिन लुंगसे | Updated: June 3, 2025 23:52 IST

म्हाडाच्या ज्या प्रकल्पांमध्ये झाडे तोडावी लागतील तिथे झाडांची पुनर्लागवड बंधनकारक करण्याबाबत एक परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे

मुंबई : जुलै महिन्यात देशात साजरा करण्यात येणाऱ्या वन महोत्सव सप्ताह निमित्त म्हाडातर्फे राज्यात सुमारे दोन लाख झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ५० हजार झाडे मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रात लावण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हाडा मुख्यालयात सोमवारी आयोजित विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिली. तर लागवड केल्या जाणाऱ्या सर्व झाडांना जिओ टॅग केले जाईल.

म्हाडाच्या ज्या प्रकल्पांमध्ये झाडे तोडावी लागतील तिथे झाडांची पुनर्लागवड बंधनकारक करण्याबाबत एक परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. प्रारंभी ही बाब फक्त मुंबईसाठी लागू असेल आणि नंतर इतर विभागीय मंडळांमध्येही हे लागू करण्यात येईल, असेही ते म्हणाले. संजीव जयस्वाल यांनी सांगितले की १ जुलै ते ७ जुलै दरम्यान म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळाच्या अखत्यारीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात यावे .याकरिता मुंबई क्षेत्रातील अविकासयोग्य भूखंड जिथे बांधकाम किंवा कोणताही विकास करता येत नाही, अशा भूखंडांची ओळख पटवावी. त्याठिकाणी मियावाकी पद्धतीने घनदाट शहरी जंगले निर्माण करण्याचे नियोजन करावे. ही पद्धत कमी जागेत अधिक झाडे लावून जैवविविधता वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते.

म्हाडाची विभागीय मंडळे जसे मुंबई गृहनिर्माण मंडळ व कोंकण गृहनिर्माण मंडळ यांच्या अखत्यारीतील गृहनिर्माण वसाहतींच्या आवारात वृक्ष रोपण करता येईल, याचा अभ्यास करावा. या दोन्ही मंडळांनी प्रत्येकी ५० हजार व २५ हजार वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प जयस्वाल यांनी मांडला. विशेष म्हणजे, वृक्षारोपणासाठी केवळ पर्यावरणपूरक झाडांचीच निवड करण्यात यावी,असेही त्यांनी सांगितले. झाडांच्या दीर्घकालीन देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांवर सोपवण्यासही सांगितले. ज्यामुळे वृक्षारोपण केवळ एक मोहीम न राहता, एक शाश्वत प्रयत्न बनेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.२५ हजार झाडांचे रोपण१ ते ७ जुलै या कालावधीत साजरा होणाऱ्या ‘वन महोत्सव’ निमित्ताने, म्हाडाच्या मुंबई व सर्व विभागीय मंडळांमध्ये म्हाडाच्या वतीने वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती या म्हाडाच्या विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातून प्रत्येकी मंडळाने २५ हजार झाडांचे रोपण करण्याचे आवाहन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले.

टॅग्स :म्हाडा लॉटरी