Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या नावाने कोटींची लूट, तोतया म्हाडाच्या अधिका-यांकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 03:13 IST

अवघ्या ११ ते १६ लाखांत म्हाडात घरे मिळत असतील तर सावधान. म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना गंडा घालणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. अशाच एका रॅकेटच्या चौकडीला भोईवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मुंबई : अवघ्या ११ ते १६ लाखांत म्हाडात घरे मिळत असतील तर सावधान. म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना गंडा घालणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. अशाच एका रॅकेटच्या चौकडीला भोईवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी आतापर्यंत १८७ जणांना ३ कोटींचा चुना लावल्याची माहिती समोर आली. या प्रकरणातील मास्टरमाइंड अस्लम शेख (४३) पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.दादर परिसरात राहणारे रोहन मोरे (३२) हे या रॅकेटच्या जाळ्यात अडकले. म्हाडाचे अधिकारी असून अवघ्या १६ लाखांत म्हाडात घर मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले. त्यांनीही मुंबईत स्वस्तात हक्काचे घर मिळणार म्हणून यात गुंतवणूक केली. पैसे भरूनही घर मिळत नसल्याने यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून भोईवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धगे, पोलीस अंमलदार पोलीस नाईक राज कंठे, करंटे, अहिरे, पाटील, मोपरी यांनी तपास सुरू केला.तपासादरम्यान भोईवाड्यातून स्वामी उर्फ रामदास भास्कर चव्हाण (४१), नालासोपारातून बंटी उर्फ विजेंद्र यशवंत पेडकलकर (३७) या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यापाठोपाठ रियल इस्टेटचा एजंट मोहम्मद हसन अब्दुल अजीज कुरेशी (४५) याला गोवंडीतून तर अमित बाळासाहेब जावळे (४३) याला खंडाळा येथून अटक करण्यात आली. यामागील मुख्य सूत्रधार अस्लम शेखच्या सांगण्यावरून ही मंडळी काम करत असल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार, त्याच्या सीडीआर लोकेशनवरून शेखचा शोध सुरू आहे.हे रॅकेट म्हाडा अधिकारी असल्याचे भासवून गरजू तसेच घरांच्या शोधात असलेल्या नागरिकांना हेरायचे. त्यांना म्हाडामध्ये अवघ्या ११ ते १६ लाखांत घर देण्याचे आमिष दाखवायचे. त्यांच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी गुंतवणूक केली. आतापर्यंत या रॅकेटने १८७ जणांना ३ कोटींचा चुना लावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.तुमचीही फसवणूक झाल्यास पुढे या...यामध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. यामध्ये फसल्या गेलेल्यांची संख्या जास्त असल्याचा संशय पोलिसांना आहे.बसचालकाला १९ लाखांचा गंडागिरगावातील रहिवासी असलेले बेस्टचालक विजय मल्हारी कांबळे (५२) यांना म्हाडामध्ये स्वस्तात सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली १९ लाखांचा गंडा घातला. त्यांच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी शुक्रवारी जावेद अलिशा पटेल (४३) याला बेड्या ठोकल्या.म्हाडामध्ये अधिकारी ओळखीचे असल्याचे भासवून खोट्या कागदपत्रांच्या आधारे पटेल फसवणूक करत होता. भोईवाडा रॅकेटमध्ये त्याचा समावेश आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे.म्हाडा अधिकारी, कर्मचाºयांचाही सहभागया रॅकेटमध्ये काही म्हाडा अधिकारी आणि कर्मचारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली.बोगस कागदपत्रांच्या आधारे करारअटक चौकडी बोगस कागदपत्रांच्या आधारे नागरिकांना सदनिकांचे करारपत्र द्यायची. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास बसायचा. त्यांच्याकडून काही बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :मुंबई