मुंबई : ज्या लॉटरीची मुंबईकर आतुरतेने वाट बघत असतात, त्या म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उशीरच होणार आहे. त्यामुळे स्वस्तात घर घेण्यासाठी इच्छुक मुंंबईकरांना यंदाही स्वस्त घरासाठी वाटच पाहावी लागणार आहे. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, अत्यल्प उत्पन्न गटाला यंदा म्हाडाची लॉटरी लागणार आहे. गेल्या वर्षी या गटासाठी लॉटरीत एकही घर उपलब्ध नव्हते. यंदा या गटासाठी म्हाडा ४०० घरे उपलब्ध करून देईल, असा अंदाज आहे.म्हाडाची लॉटरी नेमकी कधी जाहीर होणार, याबाबत अजूनही निर्णय झाला नसला, तरी मागच्या वर्षी झालेली लॉटरीमधील चूक सुधारण्याचा प्रयत्न यंदा म्हाडाकडून केला जात आहे. गेल्या वर्षी म्हाडाच्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न घटकांच्या गटात एकही स्वस्त घर नव्हते. त्यामुळे तेव्हा बरीच टीका झाली होती.म्हाडाच्या मागच्या वर्षीच्या लॉटरीत एकूण ८१९ घरांचा समावेश करण्यात आला होता. या वर्षी ही संख्या वाढवून ९५० ते १००० करण्याचा म्हाडाचा विचार आहे. यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या रोज बैठका सुरू आहेत. या प्रस्तावाला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम, सध्या म्हाडाच्या अधिकाºयांकडून सुरू असल्याचे समजते.येथे घरे उपलब्धबोरीवलीतील महावीरनगर, गोरेगाव, विक्रोळीमधील कन्नमवारनगर, घाटकोपरमधील पंतनगर, अँटॉप हिल, मुलुंडमधील गव्हाणपाडा, मानखुर्द येथे या वर्षी म्हाडाची घरे लॉटरीसाठी उपलब्ध असतील.उशीर होण्यामागचे कारण काय?दरवर्षी मेमध्ये जाहीर होणारी लॉटरी, याही वर्षी साधारण दोन ते तीन महिने पुढे जाण्याची शक्यता आहे.स्सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने, म्हाडाचे बरेच अधिकारी अधिवेशनाच्या कामकाजात व्यस्त आहेत. अधिवेशनाचे सूप वाजले की, लॉटरीच्या पुढच्या कामांना वेग येईल. अधिकारी अधिवेशनातून मोकळे होतील आणि लवकरात लवकर लॉटरीचा कार्यक्रम जाहीर होईल.लॉटरीच्या घरांची जाहिरात किमान ४५ दिवस आधी जाहीर करणे बंधनकारक आहे. अजून याबाबत काहीच हालचाली नसल्याने, साहजिकच अजून तीन महिन्यांनंतरच लॉटरीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.या वर्षी म्हाडांच्या घरांच्या किमती काय असतील, तेदेखील ठरणे बाकी आहे. जीएसटीचे दर, रेडीरेकनरच्या दरांचा अभ्यास करून, म्हाडाच्या घरांची अंतिम किंमत काढण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठीही म्हाडाची लॉटरी! १ हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:26 IST