Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा लॉटरी: १० मिनिटांत ११५ अर्ज आले 

By सचिन लुंगसे | Updated: May 22, 2023 19:06 IST

सोडतीचा शुभारंभ केल्याच्या दहा मिंनिटांमध्ये सुमारे  ११५ अर्ज सोडत प्रणालीत प्राप्त झाले व सहा अर्जदारांनी पेमेंट देखील केले.

मुंबई : मुंबई  गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली , बोरीवली , विक्रोळी , घाटकोपर , पवई , ताडदेव , सायन , येथे विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या  कार्यालयाच्या समिति सभागृहात मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला. सोडतीचा शुभारंभ केल्याच्या दहा मिंनिटांमध्ये सुमारे  ११५ अर्ज सोडत प्रणालीत प्राप्त झाले व सहा अर्जदारांनी पेमेंट देखील केले.

मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली , मार्गदर्शक सूचना, सदनिकांचे विवरण, पात्रतेचे निकष व आरक्षण प्रवर्ग यांबाबत माहिती  या पुस्तिकेत नमूद करण्यात आली आहे.  ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडो मध्ये इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन या वेळी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे. दरम्यान बोरीकर यांनी सोडत कार्यप्रणालीच्या नियोजनाचा आढावा घेतला.सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत कार्यक्रम १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे पश्चिम येथील  रंगशारदा नाट्यगृहात आयोजित करण्यात येणार आहे. सोडतीत  सहभाग घेण्याकरिता अर्जदारांना सात कागदपत्रे सादर करवायची आहेत . यामध्ये अर्जदारांना उत्पन्नाचा दाखला वा प्राप्तीकर विवरण पत्र हे 2021-22 या आर्थिक वर्षातील सादर करावयाचे आहे. तसेच सर्व कागदपत्रे सादर करणारे अर्जदार हे संगणकीय सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यास पात्र ठरतील. त्यांच्या अर्जंची सोडत काढल्यानंतर पात्र अर्जदारांची यशस्विता ठरविण्यात येईल.२२ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय मंडळातर्फे नागरिकांकरीता खुला राहणार आहे. त्याचबरोबर  २६ जुन रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत  ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. २८ जून रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.  सोडतीसाठी प्राप्त  अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  प्रारूप यादीवर अर्जदारांना  ७ जुलै पर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. यानंतर १२ जुलै, २०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.मंडळातर्फे जाहीर  करण्यात आलेल्या सदनिकांमध्ये प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत १९४७ सदनिकांचा समावेश आहे तर १७९५ सदनिका म्हाडा योजनेतील आहेत तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत १३९ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या ७५ सदनिका , विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत २५ सदनिका तर १०२ विखुरलेल्या सदनिकांचा समावेश आहे. तसेच उत्पन्न गटनिहाय  अत्यल्प उत्पन्न गटासाठी २७९०, अल्प उत्पन्न गटासाठी १०३४, मध्यम उत्पन्न गटासाठी १३९ आणि उच्च उत्पन्न गटासाठी १२० सदनिका आहेत. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपयापर्यंत  आवश्यक आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नाही. उपरोक्त चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात.  प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत ही केंद्र व राज्य शासनाचे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे. हेल्पलाइन ०२२-६९४६८१००

टॅग्स :म्हाडा