Join us  

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी; अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील घरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:16 AM

९,१४० घरांच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार

- योगेश जंगममुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ९,१४० घरांच्या लॉटरीची जाहिरात काढण्यात येणार आहे. या लॉटरीतील घरे ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण(पलावा) खोणी, शिरढोण अशा विविध ठिकाणची असणार आहेत. खासगी विकासकाकडून म्हाडाला जी २० टक्के घरे मिळाली आहेत, त्यांची किंमत ठरविण्याचे काम सध्या म्हाडामार्फत पूर्ण करण्यात आले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या घरांसाठी जाहिराती काढण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईमध्ये सर्वसामान्यांसाठी या वर्षामध्ये घरे उपलब्ध होणार नसल्याने मुंबईकरांना २०२२-२०२३पर्यंत घरांसाठी वाट पाहावी लागणार आहे. मात्र कोकण मंडळाकडून मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होणार असल्याने या लॉटरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ठाणे येथे १००, नवी मुंबई येथे ४०, कल्याणमधील पलावा येथे विकासकांकडून मिळालेली २० टक्के घरे ही २००० घरे असतील, तर म्हाडाच्या विविध प्रकल्पांतील ६०००, गेल्या लॉटरीतील शिल्लक असलेली १००० अशा एकूण ९,१४० घरांचा समावेश आहे. तसेच या लॉटरीमधील घरे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील असतील, असे म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी माधव कुसेकर यांनी स्पष्ट केले.मुंबईतील घरासाठी पाहावी लागणार दोन वर्षे वाट- २०२०मध्ये सामान्यांसाठी मुंबईत फारशी घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना २०२२-२०२३पर्यंत घरांसाठी वाट पाहावी लागणार आहे. सर्वत्र सात ते आठ हजार घरांचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ही घरे सोडतीत घेण्यास म्हाडा तयार नसल्याचे सूत्रांकडून समजते.

टॅग्स :म्हाडा