Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार; म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची माहिती

By सचिन लुंगसे | Updated: August 26, 2024 07:58 IST

म्हाडाची घरे म्हणजे मुंबईत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आशेचा किरण. मात्र, अलीकडच्या काळात म्हाडाची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याचे चित्र आहे. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटांतील लोकांना या घरांच्या किमती परवडेनाशा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'चे उपमुख्य उपसंपादक सचिन लुंगसे यांनी घेतलेली म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची मुलाखत.

आठवड्याची मुलाखत, संजीव जयस्वाल उपाध्यक्ष, म्हाडा|

म्हाडाच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी काय करणार?

म्हाडाच्या ३३ (५) आणि ३३ (७) अंतर्गत सरप्लस टेनेमेंटस म्हणून रिकामी घरे म्हाडाला प्राप्त होतात. त्यांची किंमत रेडीरेकनर दराच्या ११० टक्के आकारण्याबाबत जे धोरण आहे त्यानुसार किमती आकारल्या आहेत. यातील बरीच घरे दक्षिण मुंबईमधील मोक्याच्या ठिकाणी असल्याने तेथील रेडीरेकनर दर जास्त आहेत. त्यामुळे किंमत काहीशी जास्त आहे.

... तरी घरे महाग का?

रेडीरेकनरशी संबंधित विक्री किंमत निश्चित करण्याचे धोरण आहे. त्यामुळे सरप्लस अंतर्गत मिळालेल्या घरांच्या किमती जास्त आहेत. त्या कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. म्हाडाला ज्या ठिकाणी नाममात्र दराने जमिनी मिळाल्या आहेत अशा जमिनीवरील प्रकल्पांतील घरांच्या किमती या बिल्डरकडे उपलब्ध असलेल्या घरांच्या ४० टक्के ते ५० टक्क्यांहून कमी आहेत. गोरेगावमधील मध्यम उत्पन्न गटातील ७०० चौरस फुटांच्या घराची किंमत १ कोटी १० लाख आहे. प्रत्यक्षात या घराची बाजारभावानुसार किंमत २ कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे नाममात्र दरात मिळालेल्या जमिनीवरील म्हाडाची घरे महाग आहेत, असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही.

म्हाडाच्या नव्या लॉटरीत घरे कुठे असतील?

कोपरी, पवई, बोरीवली, पहाडे गोरेगाव, वरळी तसेच संक्रमण गाळे व पुनर्रचित गाळ्यातून मिळणाऱ्या घरांची संख्या पाहता पुढील वर्षीच्या लॉटरीसाठी मुंबईत ३ हजार ६६० घरे उपलब्ध असतील. तर कोकण मंडळात शिरढोण, गोठेघर, खोणी येथील योजना प्रगतीपथावर असून, येथे ४ हजार ४७ घरे म्हाडाला मिळणार आहेत. या घरांच्या किंमती १८ ते २५ लाख असतील.

ताडदेव येथील ७ कोटींच्या घरांचे काय करणार?

चटई क्षेत्र निर्देशाकांनुसार उत्पन्न गट निश्चित होत असल्याने काही घरांच्या बाबतीत पात्र असूनही काही लोकांना अर्ज करता येत नाही, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे घरांच्या किमतीनुसार उत्पन्न गट निश्चित करण्याबाबत तसेच अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातील घरांची जास्तीत जास्त किंमत काय असावी याबाबत अल्पावधीतच धोरण निश्चित करणे अथवा बदल करण्याचे विचाराधीन आहे. ताडदेव येथील घरांची किंमत कमी केल्यास ती निश्चित विकली जातील.

मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रकल्पांतून म्हाडाला किती घरे मिळतील?

बीडीडी चाळ पुनर्विकास, पत्राचाळ पुनर्विकास, अभ्युदय नगर पुनर्विकास, पीएमजीपी जोगेश्वरी तसेच जीटीबी नगर अशा ठिकाणी पुनर्विकास योजना सुरू आहेत. यातून येत्या ३ ते ४ वर्षांत सुमारे १२ हजार ६२१ घरे मिळतील.

टॅग्स :म्हाडा