Join us  

आनंदवार्ता! म्हाडाच्या घरांची लॉटरी ५ डिसेंबरला 

By सचिन लुंगसे | Published: November 29, 2023 5:18 PM

५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.

मुंबई : म्हाडाच्यापुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता ५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ५ सप्टेंबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५८६३ सदनिकांसाठी सुमारे ६०,००० अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी मंडळातर्फे सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

म्हाडा पुणे मंडळाच्या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील ६९ सदनिका, सांगली जिल्ह्यातील ३२ सदनिका व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी या सोडतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :मुंबईपुणेम्हाडा