Join us
Daily Top 2Weekly Top 5

घरे बांधणाऱ्या ‘म्हाडा’ने चक्क उभे केले जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:06 IST

दोन हजार चौरस फूट जागेत ४० प्रकारची सुमारे ३०० झाडेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील ...

दोन हजार चौरस फूट जागेत ४० प्रकारची सुमारे ३०० झाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील वृक्षांची दिवसागणिक कत्तल होत आहे. जंगल तर नावाला राहिले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न आणखी गंभीर होत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मिनी फॉरेस्ट संकल्पना राबवली जात असून, आता या संकल्पनेनुसार वांद्रे येथील ‘म्हाडा’च्या मुख्यालय परिसरात मिनी फॉरेस्ट तयार केले जात आहे. यात महत्त्वाचे म्हणजे येथे दोन हजार चौरस फूट जागेत ४० प्रकारची सुमारे ३०० झाडे लावण्यात आली आहेत.

राज्याच्या वन महोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. सर्वप्रकारची कार्यालये, गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात मिनी फॉरेस्ट निर्माण करावे, या संकल्पनेतून म्हाडा कार्यालयात मिनी फॉरेस्ट तयार केले जात आहे. गुरुवारी याचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे उपस्थित होते. दरम्यान, मिशन ग्रीन मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या मिनी फॉरेस्टची निर्मिती करण्यात येत आहे. येथे वाहन पार्किंगच्या दोन हजार चौरस फूट जागेत ४० प्रकारची सुमारे ३०० झाडे लावण्यात आली आहेत.

दुसरीकडे मुंबई महापालिकादेखील मियावाकी वनाबाबत आग्रही आहे. पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प गेल्यावर्षीपासून राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात महापालिका क्षेत्रातील विविध ५७ ठिकाणी मियावाकी पद्धतीच्या नागरी वनांची टप्प्याटप्प्याने रुजवात करण्यात येत आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात लागवड करण्यात आलेल्या ४३ ठिकाणच्या मियावाकी वनांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे‌. या ४३ ठिकाणी तब्बल २ लाख २१ हजार ४०५ झाडे लावण्यात आली असून, यापैकी बहुतांश झाडांनी अवघ्या वर्षभरातच कमाल ५ ते ७ फुटांची उंची गाठली आहे.

- कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे अशी वने देवराईशी आणि अर्बन फॉरेस्ट संकल्पनेशी नाते सांगणारी असतात.

- वनांमध्ये विविध ५० प्रजातींची झाडे लावण्यात येतात.

- फळझाडे, फुलझाडे, औषधी गुणधर्म असणारी झाडे अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश असतो.

- अशाप्रकारची वने मुंबई शहराची फुफ्फुसे आहेत.