Join us  

म्हाडाच्या पवईत ४५० आणि विरारमध्ये ५०० सदनिका बांधण्याची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 8:33 PM

मुंबईतील तुंगा पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४५० सदनिका तर विरार बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ५०० सदनिका बांधण्यासाठी निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई: मुंबईतील तुंगा पवई येथे मध्यम उत्पन्न गटासाठी ४५० सदनिका तर विरार बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ५०० सदनिका बांधण्यासाठी निविदा मागविण्यास मान्यता देण्यात आली आहे. गिरणी कामगारांना म्हाडामार्फत विक्री करण्यात आलेल्या सदनिका ५ वषार्नंतर विक्री करता येऊ शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. पूर्वी या सदनिका १० वर्षापर्यंत विक्री करता येत नव्हत्या.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, म्हाडाला शासनाने सदर खर्च परत करण्याच्या अटीवर ही मान्यता देण्यात आली आहे. सदरहू प्रकल्पाचे संकल्प चित्र, आराखडे, नकाशे, अंदाजपत्रक तयार करणे, आवश्यक परवानग्या प्राप्त करणे, कामावर देखरेख ठेवणे यासाठी प्रकल्प समंत्रकाची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विरार बोळींज येथे म्हाड विनियम १३ (२) अंतर्गत कलाकार (३०० सदनिका), म्हाडा कर्मचारी (२०० सदनिका), पत्रकार (२०० सदनिका), शासकीय कर्मचारी (२०० सदनिका) अशा एकूण ९०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

१५५ कोटी रुपये खर्चास मंजुरी

रत्नागिरी येथील पोलीस विभागाच्या जमिनीवरील पोलीस वसाहतीचा पुनर्विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता १५५ कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्याचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

३७.४० कोटी रुपये खर्चास मंजुरी

कोंकण मंडळाने जोगळे दापोली येथे संपादित केलेल्या ०.८१ हेक्टर जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी तळ +४ मजल्यांच्या इमारतीमध्ये १६० सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ८० सदनिका व सभागृह बांधणे या कामासाठी ३७.४० कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे खाजगी जमिनीवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  अत्यल्प उत्पन्न गटासाठी १५० सदनिका उभारण्यास मंजुरी देण्यात आली.पूरग्रस्तांना १० कोटी 

सांगली, कोल्हापूर येथे आलेल्या पुरामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यामुळे या पूरग्रस्तांना मदतीसाठी म्हाडातर्फे १० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.

टॅग्स :म्हाडाविरारपूर