Join us  

धारावी पुनर्विकासात म्हाडाचे १५० कोटी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 1:24 AM

धारावीच्या पुनर्विकासात सेक्टर-५ मधील म्हाडाच्या मालकीच्या सात एकर जागेचा समावेश आहे. ही जागा हातातून जाऊ नये म्हणून म्हाडाने आता प्रयत्न सुरू केले आहेत.

- अजय परचुरेमुंबई : धारावीच्या पुनर्विकासात सेक्टर-५ मधील म्हाडाच्या मालकीच्या सात एकर जागेचा समावेश आहे. ही जागा हातातून जाऊ नये म्हणून म्हाडाने आता प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार म्हाडाने गृहनिर्माण विभागाला पत्र लिहिले आहे. या पत्रात धारावी पुनर्विकासातून म्हाडाच्या मालकीची ७ एकर जागा वगळण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिली आहे.धारावीतील पाचही सेक्टरचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येत असून त्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून निविदाही मागवण्यात आल्या आहेत. या पुनर्विकासात सेक्टर-५ मधील म्हाडाच्या मालकीच्या सात एकर जागेचा समावेश आहे.धारावीतील पुनर्विकासात सेक्टर ५ च्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाकडे होती. सेक्टर ५ मध्ये म्हाडाची सात एकर जागा आहे. या जागेवरील जुनी संक्रमण शिबिरे पाडत म्हाडाने तब्बल १५० कोटी खर्च करत नवी संक्रमण शिबिरे उभारली होती. यात तब्बल ३००० संक्रमण शिबिरांचे गाळे आहेत. या सात एकर जागेमधील मोकळ्या जागेवर सेक्टर-५ च्या पुनर्विकासांतर्गत म्हाडाने ३५० हून अधिक घरांचा एक टॉवर उभारला आहे. तर अंदाजे १३०० घरांच्या २ टॉवरचे काम अपूर्णावस्थेत आहे. पण आता हा संपूर्ण प्रकल्प विशेष प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पाने ताब्यात घेत त्याचा एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या सात एकर जागेचा आणि त्यावरील संक्रमण शिबिराचाही पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गतच केला जाणार आहे.म्हाडाच्या मालकीच्या या ७ एकर जागेवरच धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ५ पुनर्वसित इमारती बांधण्यात येत आहेत. त्यातील एका इमारतीचे बांधकाम याआधीच पूर्ण झाले आहे. तर इमारत क्रमांक २ आणि ३ चे काम सुरू होते. ते आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या ताब्यात गेले आहे. इमारत क्रमांक २ मध्ये ६६० निवासी तर १२ अनिवासी गाळे असून इमारत क्रमांक ३ मध्ये ६७२ निवासी गाळे आहेत. त्याचवेळी इमारत क्रमांक ४ आणि ५ च्या आराखड्याला डीआरपीची मंजुरी मिळाली असून सीसीसाठी प्रस्तावही धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे गेला आहे. पण आता हा प्रकल्प डीआरपीने ताब्यात गेल्याने अर्धवट झालेले काम आता थांबले आहे. हे काम कधी आणि कसे सुरू होणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करू देण्याची मागणीही पत्राद्वारे गृहनिर्माण विभागाला म्हाडाकडून करण्यात आली आहे.आर्थिक फटका बसणारमुळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे घरांसाठी मोकळी जागा नसताना हातात असलेली जागा म्हाडाच्या हातातून निघून जाणार आहे. तर संक्रमण शिबिरासह धारावीकरांसाठी उभारलेल्या पुनर्वसित इमारतीच्या बांधणीचा खर्चही वाया जाणार असून म्हाडाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पातून ७ एकर जागा वगळावी, अशी मागणी म्हैसकर यांनी गृहनिर्माण विभागाकडे एका पत्राद्वारे केल्याचे म्हैसकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :म्हाडा