Join us

मेट्रोचाही मेगाब्लॉक!

By admin | Updated: January 23, 2015 01:59 IST

उपनगरीय रेल्वेच्या मेगा ब्लॉकने हैराण असलेल्या मुंबईकरांना आता मेट्रोच्या प्रवासातही त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे.

उद्यापासून दोन तास : पहाटे तीन दिवस बंद राहणारमुंबई : उपनगरीय रेल्वेच्या मेगा ब्लॉकने हैराण असलेल्या मुंबईकरांना आता मेट्रोच्या प्रवासातही त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असलेल्या मेट्रोचा पहिला मेगाब्लॉक तब्बल तीन दिवस पहाटे साडेपाच ते सकाळी साडेसात प्रयत्न राहणार आहे. येत्या शनिवारी (दि.२४) पासून सोमवारपर्यत सकाळी दोन तास तांत्रिक कामासाठी मेट्रोची सेवा बंद राहणार आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मेट्रो वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपर या मार्गावर धावत आहे. एखाद् दुसरी तांत्रिक समस्या वगळता मेट्रो रेल्वेच्या सेवेत खंड पडलेला नाही. शिवाय मेट्रो तिकिटाच्या दरवाढीचा प्रश्न वगळला तर वातानुकुलित प्रवासामुळे नागरिकांना वेळेची बचत होण्याबरोबरच लोकलच्या गर्दीतून सुटका झाली आहे. आता पहिल्यादाच २४, २५ आणि २६ जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेट्रो रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दिवशी सकाळी ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेत मेट्रोची वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान मेट्रोच्या काही महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर २७ जानेवारीपासून मेट्रो पुन्हा एकदा नियोजित वेळेनुसार मुंबईकर चाकरमान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे. २४, २५ आणि २६ जानेवारी हे सुट्ट्यांचे दिवस आहेत. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांना त्रास होऊ नये म्हणून मेगाब्लॉकसाठी हे दिवस निश्चित केल्याचे मेट्रोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)