Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या सेवेत उद्यापासून ३० टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील कोरोना रुग्णांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत आहे. परिणामी बंधने शिथिल केली जात असून, अनेक सेवा खुल्या केल्या जात आहेत किंवा त्यामध्ये वाढ केली जात आहे. याच सेवांपैकी एक असलेल्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या सेवांत सोमवार, ७ जूनपासून ३० टक्क्यांची वाढ केली जाईल.

मुंबई मेट्रो वनकडून मिळालेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पीक अवरला दोन मेट्रोमधील अंतर हे दहा मिनिटे असेल आणि उर्वरित वेळेत हे अंतर १५ मिनिटे असेल. वर्सोवा येथून सकाळी ६.५० वाजता पहिली मेट्रो सुटेल. शेवटची मेट्रो घाटकोपर येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल, तर स्थानके १५ मिनिटे अगोदर खुली केली जातील.

दरम्यान, मुंबई मेट्रो वनने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहिमेचेही आयोजन केले होते. त्यानुसार, २४ जूनला १८ ते ४४ वयोगटांतील ४०० कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, तर ४५ वयावरील जे कर्मचारी आहेत त्यांना एप्रिलमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आला.

...................................