मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोची भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने घेतला आहे. त्यानुसार नवीन भाडे १ डिसेंबरपासून लागू होणार असून, जास्तीतजास्त भाड्यात ५ रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. कमी अंतरावरच्या भाड्यात वाढ नसल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले. सध्या एकमार्गी प्रवास करण्यासाठी १0, २0, ३0 आणि ४0 रुपयांचे असलेले भाडे आता १ डिसेंबरपासून अनुक्रमे १0, २0, २५, ३५ आणि ४५ रुपये असेल; तर रिटर्न प्रवासात टोकनसाठी सध्या १0, १५, २५ आणि ३0 रुपये भाडे आकारले जात असून, नवीन भाडे आकारणी अनुक्रमे १0, २0, ३0 आणि ३५ अशी होईल. महिन्याला ४५ ट्रिप पासची सुविधाही मेट्रोकडून देण्यात येत असून, त्यासाठी दोन टप्प्यांत भाडे आकारणी केली जाते. सध्या ६७५ आणि ९00 रुपयांच्या पाससाठी आता अनुक्रमे ७२५ आणि ९५0 रुपये मोजावे लागतील.मेट्रो सुरू केल्यानंतरही ती फायद्यात नसून वर्षाला ३00 कोटींच्या नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात सरकारशी बोलणी सुरू असली तरी भाडेवाढ करणे अपरिहार्य होते, असे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१ डिसेंबरपासून मेट्रोची भाडेवाढ
By admin | Updated: November 28, 2015 02:09 IST