Join us  

मेट्रो-३चे काम, सहा महिने थांब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 2:44 AM

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-३ चे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेट्रो-३च्या कामाची गाडी रुळावरून घसरली असून, काम पूर्ण करण्यास जून २०२१ उजाडणार आहे.

- अजय परचुरे मुंबई : कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-३ चे काम डिसेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मेट्रो-३च्या कामाची गाडी रुळावरून घसरली असून, काम पूर्ण करण्यास जून २०२१ उजाडणार आहे. त्यामुळे मेट्रो-३ची डेडलाइन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) राज्य सरकारला दिली आहे. कामास होणाºया विलंबामुळे मेट्रो-३च्या खर्चातही तब्बल ७६५ कोटी रुपयांनी वाढ होणार आहे.मेट्रो-३ सुरू झाल्यावर फोर्ट, चर्चगेट भागांत नोकरीसाठी जाणाºया चाकरमान्यांचा वेळ वाचणार आहे. शिवाय वाहतूककोंडी सोडविण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे मुंबईकर मेट्रो-३च्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या मेट्रो-३च्या कामामुळे मेट्रोच्या मार्गावर सकाळी आणि संध्याकोळी प्रचंड वाहतूककोंडी होत असल्यामुळे हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, नेहमीच या ना त्या कारणामुळे मेट्रो-३च्या कामाची गाडी रुळावरून घसरल्याचे पाहायला मिळत आहे. मेट्रो-३च्या कामासाठी दरदिवशी जवळपास सव्वाचार कोटी रुपयांचा खर्च होतो. या हिशेबाने काम लांबणीवर पडल्याने, आता या खर्चात तब्बल ७६५ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.>मेट्रो-३ प्रकल्पाचे आत्तापर्यंत झालेले कामकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाचे कंत्राट देऊन आता १८ महिने पूर्ण झाले आहेत. हा मार्ग ३३.५ किलोमीटर भुयारी मार्ग आहे. या मार्गिकेचे सात टप्प्यांमध्ये काम करण्यात येत असून, आत्तापर्यंत एकूण १ हजार २६७ मीटर लांबीचे भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती, मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबईत विविध ठिकाणी होत असलेल्या भुयारीकरणाच्या कामाकरिता, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) १७ टनेल बोअरिंग मशिन्सची (टीबीएम) गरज भासणार असून, त्यापैकी ११ मशिन्स शहरात दाखल झाले आहेत. आतापर्यंत ८ मशिन्सद्वारे भुयारीकरणाचे काम करण्यात येत आहे. आझाद मैदान येथील पॅकेज -२ मध्ये वैतरणा १ आणि २ टीबीएमद्वारे ग्रँट रोडपर्यंत ४.५ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी ३३० मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. नयानगर येथे पॅकेज-४ अंतर्गत कृष्णा १ आणि २ या टीबीएमद्वारे दादर मेट्रो स्थानकापर्यंत २.५ किमी भुयारीकरण करण्यात येणार असून, त्यापैकी ४९२ मीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. विद्यानगरी येथे पॅकेज- ५ अंतर्गत गोदावरी १ आणि २ या मशिन्सद्वारे विमानतळ स्थानकापर्यंत २.९८ किमी भुयारीकरण करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये भुयारीकरणास सुरुवात केल्यानंतर, आत्तापर्यंत ८ टीबीएमद्वारे १,२०० मीटर पेक्षा अधिक भुयारीकरण पूर्ण केले आहे, तसेच १४ टीबीएमचे कारखाना स्वीकृती परिक्षण पूर्ण झाले असून, प्रकल्पाला आवश्यक असणाºया १७ ही टीबीएम जुलैअखेर दाखल होणार असून, त्यानंतर भुयारीकरणास सुरुवात होण्याची शक्यता आहे.>वाहतूककोंडीचा त्रासमेट्रो-३च्या कामाची डेडलाइन हुकल्याने, आता या मार्गावर होणाºया वाहतूककोंडीचा त्रास अतिरिक्त सहा महिने पादचाºयांसह वाहनचालकांना सहन करावा लागणार आहे. शिवाय कामास झालेल्या विलंबामुळे खर्चही वाढणार आहे. त्यामुळे सबंधित विभागाने कामास गती देत काम लवकर पुर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.>का होत आहे कामाला उशीर!या मार्गावरील प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन, मागच्या वर्षी या मार्गावरील होत असलेल्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाने आणलेली तीन महिन्यांची स्थगिती, तसेच उच्च न्यायलयाने ध्वनिप्रदूषणामुळे रात्रीच्या वेळेत होत असलेल्या कामांवर आणलेली स्थगिती, यामुळे निश्चित कार्यमर्यादेत मेट्रो-३ चे काम पूर्ण होण्यास विलंब झालेला आहे. या मार्गावरून मेट्रो धावण्यास आता डिसेंबर २०२० ऐवजी जून २०२१ उजाडणार आहे. एमएमआरसीने केंद्र आणि राज्य सरकारला पत्र लिहून लेखी स्वरूपात ही संपूर्ण माहिती दिली आहे.

टॅग्स :मेट्रो