Join us  

मेट्रो-३ वेळेत पूर्ण होईल, ‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांचा आशावाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:24 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा घेत हे काम समाधानकारक आहे; आणि हे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार आणि ‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केला. मरोळ नाका येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा आढावा श्रीधरन यांनी गुरुवारी घेतला; त्या वेळी ते बोलत होते.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा घेत हे काम समाधानकारक आहे; आणि हे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार आणि ‘मेट्रोमॅन’ डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केला. मरोळ नाका येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा आढावा श्रीधरन यांनी गुरुवारी घेतला; त्या वेळी ते बोलत होते.श्रीधरन म्हणाले, मुंबई मेट्रो-३सारखा मोठा प्रकल्प राबविताना जमीन अधिग्रहण, वित्त, पर्यावरणविषयक - कायदेविषयक आव्हाने येतात. अशा प्रकारची आव्हाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने कुशलतेने पार केली आहेत. कुठल्याही प्रकल्पात बांधकामाचे कंत्राट ठरविण्याचे काम खूप आव्हानात्मक असते. बांधकामाच्या सातही पॅकेजच्या कंत्राटाचे काम खूप आव्हानात्मक होते व ते यशस्वीपणे पूर्ण केल्याचे सद्य:स्थितीतील कामाच्या प्रगतीवरून दिसून येते. कुठल्याही मोठ्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान समस्या येतात. मात्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ९५ टक्के समस्या मार्गी लावत काम प्रगतिपथावर आणले आहे. मेट्रो-३ भुयारी मार्ग प्रकल्प हा भारतातील सर्वांत आव्हानात्मक, कठीण व तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. जे अधिकारी या प्रकल्पासोबत जोडले गेले आहेत ते खरोखरीच नशीबवान आहेत. प्रकल्पाची आतापर्यंतची प्रगती पाहता मेट्रो-३ प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याचा आशावाद आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला अजून बरीच उंची गाठायची आहे. संस्थेची प्रतिमा उंच ठेवणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वसामान्यांचे हित लक्षात घेत, प्रामाणिकपणाने व पारदर्शक पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. केवळ प्रकल्प सुरू करून उपयोगाचा नाही, तर तो आर्थिकदृष्ट्या शाश्वत असायला पाहिजे. वेळेचे महत्त्व लक्षात घेत प्र्रकल्प वेळेत पूर्ण करत त्याद्वारे मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे आहे. एमएमआरसीचे अधिकारी प्रकल्पाविषयीचे योग्य निर्णय घेत प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करतील व प्रकल्प अंमलबजावणीदरम्यान सुरक्षा व नागरिकांची सुविधा याचा विचार करतील, असा विश्वासही श्रीधरन यांनी व्यक्त केला. भारतातील सार्वजनिक वाहतूक सेवेचा चेहरामोहरा बदलवणारे श्रीधरन हे मुंबई मेट्रो-३सह लखनऊ, कोची व जयपूर मेट्रोचे प्रमुख सल्लागार आहेत.

टॅग्स :मेट्रो