मुंबई : दहिसर ते डी.एन. नगर या १८.५ किलोमीटर मेट्रो मार्ग-२च्या अंमलबजावणीची जबाबदारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (डीएमआरसी) सोपविण्यात आली आहे; शिवाय दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या १६.५ किलोमीटर मेट्रो-७चे अंतरिम सल्लागार म्हणून डीएमआरसीची नेमणूक करण्यात आली आहे.राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली; या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलासाठी २५ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. शिवाय भिवंडी-निजामपूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात कल्याण रोडवर राजीव गांधी चौकापासून साईबाबा मंदिरापर्यंत ३ किलोमीटर लांबीचा फ्लायओव्हर बांधण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. दहिसर ते डी.एन. नगर हा मेट्रो मार्ग दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्ग २चा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या टप्प्याचा सविस्तर अहवाल बनविणाऱ्या डीएमआरसीकडे सोपविण्यात आली आहे. शिवाय दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो मार्ग ७ प्रकल्पासाठी डीएमआरसीची अंतरिम सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा दस्तावेज, निविदा पडताळणी, अंदाजपत्र इत्यादे कामे करण्याबाबत डीएमआरसीची मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)सर्वांगीण विकास प्राधिकरणाची भूमिकावेगवान आणि आरामदायी सार्वजनिक वाहतुकीची मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. त्यामुळे मुंबईला आणखी लौकिक मिळवून देण्यासाठी हे प्रकल्प हातभार लावणार आहेत. महानगर प्रदेशाच्या विकासासाठी असे प्रकल्प उभारणे हितकारक आहे; आणि सर्वांगीण विकास ही प्राधिकरणाची भूमिका आहे.- यू.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मेट्रो २ आणि ७ डीएमआरसीकडे
By admin | Updated: October 30, 2015 00:59 IST