Join us

मेटल इंडस्ट्रीचा ‘जय महाराष्ट्र’!

By admin | Updated: May 17, 2015 02:16 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस परदेश दौरे करीत असतानाच उद्योजकांना गुजरातच्या करप्रणालीने भुरळ घातल्याने ‘मेक इन महाराष्ट्र’ला जबर धक्का बसला आहे.

व्यापाऱ्यांचा निर्णय : गुजरातच्या आकर्षणाने मेटल इंडस्ट्रीचा ‘मेक इन महाराष्ट्र’ला धक्का!मुंबई : महाराष्ट्राची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस परदेश दौरे करीत असतानाच उद्योजकांना गुजरातच्या करप्रणालीने भुरळ घातल्याने ‘मेक इन महाराष्ट्र’ला जबर धक्का बसला आहे. कारण येथील बहुतांश मेटल इंडस्ट्री राज्याला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत गुजरातेत जाणार आहे.मुंबई मेटल असोसिएशनने शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत या संदर्भात हा निर्णय घेतला आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, अदानी ग्रुप अहमदाबाद जिल्ह्यातील अडालज गावाजवळ एक मोठे इंडस्ट्रीयल पार्क उभे करणार आहे. तिथे असोसिशनच्या ४ हजार सदस्यांपैकी २ हजार सदस्यांनी नोंदणीही केली आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधींच्या उद्योगाला फटका बसणार असून, २५ ते ३० हजार कामगार बेरोजगार होणार आहेत. मेटल इंडस्ट्रीचे अर्थकारण साधारण हजार कोटींच्या घरात असल्याचे लक्षात घेता राज्य सरकारचा शेकडो कोटींचा कर बुडणार असून, अन्य विकासालाही मुकावे लागणार आहे. मेटल अ‍ॅन्ड स्टेनलेस स्टील मर्चन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नरसिंघमल जैन म्हणाले, दहा वर्षांपासून मेटल इंडस्ट्री दुसरीकडे हलविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मेटल इंडस्ट्री गुजरातला हलविण्यामागे महाराष्ट्रातील ‘टॅक्स’कल्चर हे मुख्य कारण आहे. त्याशिवाय, उद्योगांवर होणारा परिणाम, वाहतूककोंडी, मजूरांच्या घरांचा प्रश्न, गोदाम यांसारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.यापूर्वी, असोसिएशनने महाराष्ट्रात जागा शोधण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शासनाच्या उदासिन कारभारामुळे पदरी कायम निराशा आली. त्यामुळे तीन-चार महिन्यांपूर्वी अदानी सूमहाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अदानी समूहाने सादर केलेल्या प्रस्तावाबाबत असोसिएशन समाधानी नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची मागणी केली. आता सादर झालेला हा प्रस्ताव आम्हाला मान्य असून यामुळे इंडस्ट्रीत जलद गतीने सकारात्मक बदल घडतील असा आम्हाला विश्वास आहे. सध्याचा प्रस्ताव ७००- ८०० कोटींचा आहे, तसेच दरांविषयी अदानी समूहाशी बोलणे सुरु आहे. असोसिएशनच्या २ हजार २०० सदस्यांपैकी जवळपास सर्वच सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मात्र तरीही ज्यांचा पाठिंबा नसेल त्यांना अर्धा उद्योग हलविण्याचा पर्याय खुला असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांचे म्हणणे काय आहे ?मुंबई महाग शहर ... आम्ही आमच्या समस्यांबाबत सरकारशी सहा महिने पत्रव्यवहार केला. सरकारने आम्हाला प्रतिसाद दिला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारवर आम्ही पूर्ण विश्वास ठेवला. मात्र त्यांनी त्यांच्या वचनांची पूर्ती केली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर हटविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील मंत्री आम्हाला भेट देत नाहीत. या सर्व बाबींचा विचार करूनच आम्ही स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे.निवडणुकीदरम्यान भाजपाने उद्योगांना महाराष्ट्रात जागा देऊ, असे सांगितले होते. परंतु दिलेला शब्द पाळला नाही. गेल्या काही वर्षांपासून कर, व्याज आणि दंड या विळख्यात मेटल इंडस्ट्री अडकली आहे. त्यामुळे आम्ही अदानी समूहाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला, -जितेंद्र शहा, सचिव, मेटल अ‍ॅन्ड स्टेनलेस स्टील मर्चन्ट्स असोसिएशन