Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच

By admin | Updated: August 12, 2014 01:02 IST

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे. या चार शाखांमधील परीक्षांतील अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन स्कॅन झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचा निकाल चुकीचा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे परीक्षा होऊन ६५ दिवसांचा कालावधी उलटला तरी अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून इंजिनीअरिंगच्या निकालातील गोंधळ सुरूच राहिला आहे.विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेनंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. इंजिनीअरिंगची परीक्षा होऊन ६५ दिवसांचा कालावधी उलटला तरी आठव्या सेमिस्टरसह पहिल्या सेमिस्टरचाही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मंगळवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनात गर्दी केली होती.विद्यापीठातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेमिस्टर आठच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व्यवस्थित स्कॅन झाल्या नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले असल्याचा आरोप, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले असून त्यांनी या निकालातही गोंधळ घातला आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडला असून विद्यापीठाने उत्तरतपासणीची पद्धत बदलावी, असे वैराळ यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)