Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारा चढाच : मुंबई ३७, तर विदर्भ ३९ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सलग तिसऱ्या दिवशी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले. राज्यभरातही सर्वसाधारण अशीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सलग तिसऱ्या दिवशी मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले. राज्यभरातही सर्वसाधारण अशीच स्थिती आहे. मुंबईसह उस्मानाबाद, नाशिक, सोलापूर, पुणे, मालेगाव आणि परभणी येथील कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आला. विदर्भात तर कमाल तापमान ३९ अंशाच्या घरात दाखल झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे ही शहरे होरपळली आहेत. दरम्यान, हवामानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईच्या कमाल तापमानात किंचित घसरण होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असला तरी मुंबईला फार काही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

भारतीय हवामान शास्र विभागाकडील माहितीनुसार, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

कोकण, गोव्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले. ६, ७, ८ आणि ९ मार्च रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, मुंबईतही सर्वसाधारण अशीच स्थिती राहील.

* गुरुवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

औरंगाबाद ३६.२, परभणी ३७.२, मालेगाव ३७.६, पुणे ३६.१, सोलापूर ३६.४, ठाणे ३७, सांगली ३७.२, मुंबई ३७.३, नाशिक ३६.३, जळगाव ३८.५, सातारा ३५.७, अकोला ३९.१, अमरावती ३७.८, बुलढाणा ३७.२, चंद्रपूर ३९.४, नागपूर ३७.८, वर्धा ३८.२.