Join us  

मेरा रंग दे बसंती चोला... हसत-हसत फाशीवर चढणाऱ्या शहीद वीरांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 7:53 AM

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शहिदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. शहीद भगत सिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी झाला.

मुंबई - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. 23 मार्च आणि हा दिवस इतिहासात या शहिदांच्या नावे कोरला गेलाय. 1931 मध्ये आजच्या दिवशी शहीद भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.  ९० वर्षांपूर्वी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली. 

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या शहिदांना आदरांजली वाहून हा दिवस देशभरात शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. शहीद भगत सिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी झाला. 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि तेव्हापासून स्वातंत्र्याच्या लढाईशी जोडले गेले. सायमन कमिशनचा विरोध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये त्यांचा मृत्यूही झाला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण देश रागाने उफाळला होता. त्याचवेळी चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर या स्वातंत्र्य सैनिकांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आणि 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी सॉडर्सला गोळ्या घालून ठार केले होते.  या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. 7 ऑक्टोबर 1930 रोजी कोर्टाने भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली. यानंतर भगत सिंह यांची शिक्षा कमी व्हावी यासाठी याचिका करण्यात आली होती. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष पं. मदन मोहन मालवीय यांनी 14 फेब्रुवारी 1931 रोजी त्यांच्या शिक्षेत माफी देण्यासाठी याचिका केली. याव्यतिरिक्त महात्मा गांधी या प्रकरणात लक्ष घातलं होते. मात्र, हे सर्व भगत सिंह यांच्या इच्छेविरोधात केलं जात होते. शिक्षा कमी व्हावी, असे भगत सिंह यांना अजिबात वाटत नव्हते.  

यादरम्यान, 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी या तिघांनी गाणं गायलं ....'मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे; मेरा रँग दे बसंती चोला। माय रंग दे बसंती चोला।।'

भारतमातेसाठी बलिदा देणाऱ्या शहीद वीरांना विनम्र अभिवादन 

टॅग्स :भगतसिंगमहात्मा गांधी