Join us  

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 9:58 PM

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी उड्डयण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारतर्फे आर. एन. चौबे, सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक कंपनीतर्फे जीव्हीके रेड्डी, अध्यक्ष, एनएमआयएएल यांनी सदर करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

मुंबई :  नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी उड्डयण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारतर्फे आर. एन. चौबे, सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक कंपनीतर्फे जीव्हीके रेड्डी, अध्यक्ष, एनएमआयएएल यांनी सदर करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी श्री. सुमित मल्लिक, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित करण्याकरिता सवतलधारक कंपनीची निवड करण्यासाठी जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बोली प्रक्रिया राबविण्यात येऊन सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाज पाहणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एमआयएएल) या कंपनीची निवड करण्यात आली व त्यास राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली. एमआयएलने विशेष हेतू वाहन (एसव्हीपी) म्हणून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. (एनएमआयएएल) ही सवलतधारक कंपनी म्हणून अंतर्भूत केली आणि सदर प्रकल्पातील 26% समभाग सिडकोला हस्तांतरित केले. दिनांक 8 जानेवारी 2018 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत सवलत करारनामा, राज्य शासन पाठिंबा करारनामा व भागधारकांचा करारनामा असे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले.

आज दि. 11.04.2018 रोजी सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नागरी उड्डयण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डयण संचलनालय व महाराष्ट्र शासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासंबंधीच्या कामांचा आढावा घेतला. तसेच भारत सरकारतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक संस्थेकडून विविध राखीव सेवा, जसे सीएनएस/एटीएम सेवा, कस्टम नियंत्रण, इमिग्रेशन सेवा, प्लान्ट क्वारन्टाइन सेवा, ॲनिमल क्वारन्टाइन सेवा, आरोग्य सेवा, हवामानविषयक सेवा, सुरक्षा सेवा इ. एनएमआयएलला प्राप्त व्हाव्यात यासाठी भारत सरकारतर्फे सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक नवी मुंबई इंटरनॅशनल प्रा. लि. यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारानुसार सदर राखीव सेवा सुरळीतपणे व कार्यक्षमतेने मिळाव्यात याकरिता सर्व संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त समन्वय समिती स्थापन करण्यात येईल.

प्राधिकरण आणि सवलतधारक कंपनी सामंजस्य करारानुसार ठरविण्यात आलेल्या बृहद् आराखड्याचे अंतिमीकरण, सवलत कालावधी प्रारंभ, स्वतंत्र अभियंत्याची नेमणूक आणि सर्व करारनाम्यांची अंमलबजावणी अशा अनिवार्य बाबींवर वेगाने काम करीत आहेत. सवलत करारनामा झाल्यापासून 180 दिवसांच्या आत सवलतधारक कंपनी प्रत्यक्ष कामांना सुरूवात करेल. विमानतळ गाभा क्षेत्रात एप्रिल 2017 पासून सुरू झालेली भूविकास कामे सवलतधारक कंपनीबरोबर नोव्हेशन करारनामा करून कंपनीची नेमणूक झाल्याच्या तारखेपासून कंपनीस हस्तांतरित करण्यात येतील.  

नवी मुंबई विमानतळाची प्रवासी क्षमता किमान 60 दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष (एमपीपीए) आणि मालवाहतूक क्षमता 1.5 दशलक्ष प्रति वर्ष असेल, अशा प्रकारे नियोजन करण्यात येत आहे. प्रारंभी सवलतधारक कंपनी किमान 10 दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष आणि 0.26 दशलक्ष टन कार्गो वाहतूक प्रति वर्ष इतकी क्षमता असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचा विकास करित आहे.   

टॅग्स :नवी मुंबईविमानतळ