Join us  

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 1:38 AM

मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.५० ते दुपारी ३.५० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत   सुटणाऱ्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहारदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येतील  आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा आणि शीव या स्थानकांवर थांबतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरिता ठाण्याहून सकाळी ९.५४ ते दुपारी २.४८ वाजता सुटणाऱ्या सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप-जलद मार्गावर वळविण्यात येतील आणि  शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. पनवेल-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी  ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर मार्गासह) मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ दरम्यान पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या/सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ट्रान्सहार्बर अप मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याकडे जाणारी  आणि ट्रान्सहार्बर डाऊन मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर मार्गावरील सेवा रद्द केलेल्या आहेत.ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात चालविण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे-वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील  सेवा उपलब्ध आहे. 

टॅग्स :पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेमुंबई लोकल