Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देखभाल व दुरुस्तीसाठी रविवारी १४ फेब्रुवारीला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देखभाल व दुरुस्तीसाठी रविवारी १४ फेब्रुवारीला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वेमार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. शीव व मुलुंडदरम्यान त्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यान निर्धारित थांब्यावर थांबतील. सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप जलद सेवा परळ येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. सर्व गाड्या नियाेजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने स्थानकांवर पाेहाेचतील.

हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ या वेळेत सीएसएमटी/वडाळा रोड येथून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी तसेच सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ या वेळेत सीएसएमटीहून वांद्रे / गोरेगावसाठी एकही गाडी धावणार नाही.

सीएसएमटीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल ते कुर्ला विशेष फेऱ्या चालविल्या जातील.

* पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. या काळात सर्व जलद गाड्या धिम्या मार्गावरून धावतील. दिवसा मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.

...................................